संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला पोलिसांनी पकडले आहे. कारवाई टाळण्यासाठी सराइत गुन्हेगार पुणे-सोलापूर रस्त्यावरील म्हातोबाची आळंदी परिसरात असलेल्या डोंगररांगात वास्तव्य करत होता. तेथील एका मंदिरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
शुभम संजय धुमाळ (वय २३, रा. धुमाळ मळा, कुंजीरवाडी, पुणे-सोलापूर रस्ता) असे ताब्यात घेण्यत आलेल्या सराईताचे नाव आहे. त्याला अटक करुन एक वर्षांसाठी नाशिक येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. धुमाळ याच्याविरोधात लोणी काळभोरसह विविध पोलिस ठाण्यात खंडणी, जबरी चोरी, दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे लोणी काळभोर पोलिसांनी त्याला शहरातून तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. परिमंडळ पाचचे तत्कालीन पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी त्याला जुलै २०२४ मध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार केल्यानंतर तो आदेशाचा भंग करुन लोणी काळभोर परिसरात येत होता. त्यामुळे त्याच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाईची गरज असल्याने पोलिसांनी ‘एमपीडीए’ कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित प्रस्ताव मंजूर केला. एमपीडीए कारवाईची माहिती मिळताच शुभम फरार झाला होता. त्याने मोबाइल संच वापरणे बंद केले होते. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलिसांनी त्याचा माग काढण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. तो म्हातोबाची आळंदीजवळ असलेल्या डोंगरातील गवळेश्वर मंदिरात लपून बसल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी पहाटे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची रवानगी नाशिक कारागृहात केली आहे.
निगडीत तरुणावर चाकूने हल्ला
गेल्या काही दिवसाखाली जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चाकूने वार करून जिवे मारण्याचाही प्रयत्न केलाय. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना निगडी येथील चिकन चौक येथे घडली आहे. भरत भागवत म्हस्के (३४, राहुलनगर, निगडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हृतिक सकट, सचिन जाधव, धनंजय उर्फ बबलू सूर्यकांत रणदिवे, सूरज कोंडिराम ओव्हाळ, गणेश उबाळे, विशाल ऊर्फ दुग्गु शंकर वैरागे आणि इतर साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रणदिवे, ओव्हाळ व वैरागे यांना पोलिसांनी अटक केली आहे.