संग्रहित फोटो
पुणे/अक्षय फाटक : व्हिजीबल पोलिसींगच्या धर्तीवर तसेच पुणेकरांच्या तात्काळ मदतीसाठी आणि सुरक्षित भावना निर्माण करण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘कॉप-२४’ हा उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. कॉप-२४ च्या माध्यमातून २४ पोलीस शहरात पेट्रोलिंग करणार असून, घडलेल्या घटनास्थळी तात्काळ दाखल होऊन कर्तव्य बजावणार आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. विशेष म्हणजे, या कॉप्संना वेगळा ड्रेस कोड असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या कॉप्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
पुणे पोलिसांकडून बीट मार्शल ही संकल्पना राबविली जाते. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या-त्या पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी दोन सत्रात हद्दीत पेट्रोलिंग करतात. रस्त्यावरील गुन्हेगारी कमी करण्यासह एखादा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ मदत आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेचे वातावरण सोबतच त्यांना अडचणीच्या काळात मदतीसाठी ही बीट मार्शल ही संकल्पना राबविली जात होती. परंतु, मनुष्यबळ तसेच कामाचा ताण यामुळे इफेक्टिव्ह पेट्रोलिंग होत नाही. त्यात काही ‘वाढिव’ पेट्रोलिंगवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे लक्ष भलतीकडेच असते. त्यामुळे मूळ उद्देशच पुर्णत्वास जात नसल्याचे दिसते.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यापुढे पाऊल टाकत, या बीट मार्शलपेक्षा इफेक्टिव्ह कामकाज व्हावे, यासाठी कॉप-२४ ही संकल्पना सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम प्रथम सुरू केला जाणार आहे. त्यानंतर त्याचे रूपांतर कामकाजात केले जाणार आहे. स्थानिक पोलिसांचे बीट मार्शल बंद करून पुर्ण काळ ७०० कर्मचारी दोन सत्रात पेट्रोलिंग करणार आहेत. या कॉप-२४ चे कामकाज गुन्हे शाखेकडून चालणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात ४ कर्मचारी दोन सत्रात काम करतील. त्यामुळे पुणेकरांना मदत, गुन्हेगारीला चाप आणि पोलिसांचा राबता देखील शहरात पाहिला मिळणार आहे.
असा आहे कॉप-२४ उपक्रम…
कॉप-२४ गुन्हेगारांवरही लक्ष ठेवणार…
मोक्का, एमपीडीए, तडीपार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर देखील कॉप-२४ लक्ष ठेवणार आहेत. तडीपार गुन्हेगाराच्या घरी व परिसरात जाऊन तो घरी येतो का हे चेक करणार. सोबतच सराईतांच्या हालचालींवर देेखील कॉप-२४ लक्ष ठेवणार आहेत. तर, एमपीडीए व मोक्कासारख्या गु्न्ह्यातून जामीन मिळविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. ज्यामुळे त्यांच्यावर वचक देखील निर्माण होणार आहे.
ड्रेस कोड लक्ष वेधणार…
कॉप-२४ हा उपक्रम पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. पोलिसांचे कामकाज जलद व विश्वासदर्शक तसेच पोलिसांची इमेज बिल्टअप व्हावी, यासाठी प्रयत्न या कॉप-२४ च्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यामुळे एक युनिक असा ड्रेस कोड देखील या कॉपसाठी निवडला जाणार आहे. तो कसा असावा, त्याचा रंग कसा असावा हे पोलीस आयुक्त स्वत: पाहत आहेत.