शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल 22 लाखांना घातला गंडा
पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने एकाची २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ४७ वर्षीय तक्रारदाराने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार विश्रांतवाडी भागात राहायला आहेत. गेल्या वर्षी १२ डिसेंबर रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. त्यानंतर तक्रारदाराने थोडी रक्कम गुंतविली. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याने त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले.
तक्रारदाराने वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने २२ लाख २८ हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा देणे बंद केले. त्यांनी चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव अधिक तपास करत आहेत.
ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक
ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे येथे राहते. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सोशल मिडीयावर पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स याला व्ह्यू मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी महिलेला प्रथम एक काम दिले. ते पुर्ण केल्यानंतर महिलेला सुरुवातीला पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने १० लाख २६ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा न देता तिची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.