सातारा हादरलं! अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून; मृतदेह नदीकाठी पुरला अन्...
पाटण : पाटण तालुक्यातील कोयना विभागातील तळीये (पश्चिम) येथील अल्पवयीन मुलीला वाटोळे येथील तरुणाने फूस लावून पळवून नेत तिचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर युवतीचा मृतदेह वाजेगाव (ता. पाटण) परिसरातील कोयना नदीच्या किनाऱ्याजवळ पुरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय ३७, मूळ रा. वाटोळे-पाटण, सध्या रा. विरार, मुंबई) याला ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून ठाणेनगर पोलिसांनी शिताफीने अटक करून कोयना पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खुनामुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये ज्ञानदेव तुकाराम सुतार (वय ३७) याने पीडित मुलीला आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कोयनानगर पोलिसांत दाखल करण्यात आली होती. कारवाईत पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, पाटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर, कोयनानगरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक एस. के. ओलेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिंगाडे, पोलिस हवालदार एस. आर. ओव्हाळ, अजित शिंदे, संतोष पाटणकर, संतोष गायकवाड, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, सनी आवटे, धीरज महाडिक, राजेंद्र नाळे, पोलिस कर्मचारी अजय पवार, सुजित निंबाळकर, अशोक निकम, साहिल निकम यांनी भाग घेतला. कोयनानगरचे सहायक पोलिस निरीक्षक ओलेकर अधिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
तपासादरम्यान आरोपीने दिली कबुली
तपासादरम्यान ठाणेनगर पोलिस ठाणे येथील पोलिस उपनिरीक्षक खेडकर व डीबी पथक यांनी कळवीले, की कोयनानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाजेगावच्या हद्दीत एका अल्पवयीन गरोदर मुलीचा तिचा प्रियकर ज्ञानदेव सुतार याने खून करून मृतदेह रस्त्याजवळ नदीच्या कडेला खड्ड्यात पुरला आहे. ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या परवानगीने एलसीबीचे पथक ठाणे पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन कोयनानगर पोलिसात हजर केले. संशयित ज्ञानदेव सुतार याच्याकडे पोलिसांनी तपास केला असता त्याने संबंधित मुलीचा गळा दाबून, खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरला असल्याचे कबूल केले.