सौजन्य - नवराष्ट्र टीम
अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत लोणावळ्यातील प्रमुख हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सची तपासणी केली. या तपासणीत अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच स्वच्छतेसंदर्भातील अनुसूची चारमधील नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले.
दि ऑर्किड हॉटेलमध्ये ११ मुदतबाह्य दुधाची पाकिटे
दि ऑर्किड हॉटेलच्या स्वयंपाकघरात आणि शीतगृहात दुधाची ११ मुदतबाह्य पाकिटे आढळून आली. तसेच कच्चे आणि शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे, स्वयंपाकघरात पाणी साचणे, अस्वच्छ फ्रीज आणि विनाझाकण कचरापेट्या अशा गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
रिदम हॉटेलच्या स्वयंपाकघरात झुरळांचा वावर
रिदम हॉटेलच्या स्वयंपाकघरासह बेकरी विभागात झुरळांचा वावर आढळला. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची स्वतंत्र साठवणूक केली जात नव्हती. अन्नपदार्थ आणि सॉसच्या बाटल्यांवर आवश्यक लेबल नव्हते. तसेच कीटक नियंत्रणासंदर्भातील नोंदीही उपलब्ध नव्हत्या.
बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड
बेसिलिका हॉटेलमध्ये मुदतबाह्य चीज आणि ब्रेड आढळून आल्याने ते जागेवरच नष्ट करण्यात आले. तसेच कच्च्या चिकनमधून रक्तमिश्रित पाणी गळत असल्याचे तपासणीत निदर्शनास आले. खाद्य रंग आणि अजिनोमोटोचा वापर होत असतानाही मेन्यू कार्डवर त्याचा उल्लेख करण्यात आला नव्हता.
द फर्न हॉटेलमध्ये मृत आणि जिवंत झुरळे
द फर्न हॉटेलमध्ये बेकरी उत्पादनांसाठी मुदतबाह्य खाद्य रंग वापरले जात असल्याचे आढळले. हे खाद्य रंग नष्ट करण्यात आले. याशिवाय स्वयंपाकघरात मृत आणि जिवंत झुरळे आढळल्याने स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
या सर्व गंभीर बाबींची दखल घेत एफडीएने चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि परवान्याच्या अटींचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास अन्न परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Ans: अन्न व औषध प्रशासनाने लोणावळ्यातील दि ऑर्किड, रिदम, द फर्न आणि बेसिलिका या चार पंचतारांकित हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले.
Ans: मुदतबाह्य दूध, चीज, ब्रेड व खाद्य रंग, झुरळांचा वावर, अस्वच्छ स्वयंपाकघर, कच्चे व शिजवलेले पदार्थ एकत्र ठेवणे आणि अन्नपदार्थांवर योग्य लेबल नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्या.
Ans: अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याने चारही हॉटेल्सचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.






