
सिया-चेतनचा डाव उघड, केतनला परराज्यात नेऊन...
पुणे : राज्यभर गाजलेल्या व्यावसायिक केतन अगरवाल (वय २५) हत्याप्रकरणात नवी माहिती समोर येत आहे. त्याची नियोजित वधू सिया गोयलला केतनशी विवाहच करायचा नव्हता. अनेक मित्र-मैत्रिणींकडे तिने ही गोष्ट बोलून दाखवली होती. धक्कादायक म्हणजे, हत्येपूर्वी सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी केतनला परराज्यात नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याचाही विचार केला होता. पण, परराज्यातील मित्राने त्यास विरोध करत हा विचार हाणून पडला.
केतनला परराज्यात नेऊन त्याचे हात-पाय तोडण्याचा आरोपींचा विचार होता. त्यासाठी रितेश हंगेच्या कर्नाटकच्या बंगळुरूतील एका मित्राशी बोलणेही झाले होते. मात्र, त्यात मित्राने या प्रकाराला विरोध करत ‘तुम्ही वेडे आहात का, असे काही करू नका,’ असा सल्ला दिला होता, असेही तपासात समोर आले. या परराज्यातील मित्राचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. दोषारोपपत्रात तो समाविष्ट आहे. तपासात सोशल मीडिया व डिजिटल पुराव्यांची पोलिसांनी पडताळणी केली. आरोपी चेतनने ‘इन्स्टा’वर ‘माही’ नावाने खाते उघडले. त्यासंदर्भातील डिजिटल पुरावेही पोलिसांनी संकलित केले आहेत.
दरम्यान, ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोषारोपपत्रातील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयीन प्रक्रियेत मांडण्याची जबाबदारी विशेष सरकारी पक्षाकडून पार पाडली जाणार आहे.
सिया हिला केतनशी करायचे नव्हते लग्न
केतनसोबत लग्नाची इच्छा नसल्याचे सियाने अनेकाकंडे बोलून दाखवले होते. त्या सर्वांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. हत्याकांडानंतर पोलिसांनी संशयित व्यक्ती, त्यांचे संपर्क, घटनाक्रम, डिजिटल पुरावे आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेला. ५३०० पानांच्या दोषारोपपत्रात त्यांची सांगड घालण्यात आली आहे. न्यायालयीन सुनावणीत त्यांची ग्राह्यता आणि त्यावर होणारी साक्ष महत्त्वाची ठरणार आहे.
सियाची तिच्या मित्रासोबतचे चॅट व्हायरल
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात, पोलिसांनी सुरुवातीला सांगितले होते की, दोन्ही आरोपी दीड महिन्यापासून सराव करत होते. त्यानंतर तपासात सांकेतिक शब्दांचा वापर उघड झाला. आता, एक चॅट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “लग्न तसेही होणार नाही…” या एका ओळीने केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासाला एक नवीन वळण दिले आहे. तथापि, पोलीस या चॅटचा तपास करत आहेत.