
भंगाराच्या पैशावरून वाद, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड घातला अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना
दत्ता काळुराम जगताप (३०, बेबड ओहळ, मुळशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. कुसुम वसंत पवार (३२) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका महिलेने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम यांच्या पहिल्या पतीचे निधन झाले त्यांना तीन मुले आहेत त्यानंतर कुसुम आणि त्यांच्या पतीचा भाऊ दत्ता हे दोघे पती-पत्नी म्हणून राहत होते. कुसुम आणि दत्ता हे भंगार जमा करणे, मासेमारी करणे अशी कामे करत होते. त्यांनी जमा केलेल्या भंगारच्या पैशांच्या कारणावरून वाद झाला. दत्ता याने पत्नी कुसुम यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने तिला काठीने डोक्यात, मानेवर आणि पोटावर मारहाण केली. ती खाली पडलेली असताना त्याने दगड उचलून तिच्या डोक्यात मारून तिला ठार केले. भांडण सोडवण्यास गेलेल्या फिर्यादीलाही आरोपीने काठीने मारून जखमी केले, ज्यामध्ये त्यांच्या हाताची बोटे फॅक्चर झाली आहेत. बावधन पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील संतापजनक प्रकार
एकतर्फी प्रेमातून तरुणीला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या घटनेप्रकरणी एका तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, समीर अकबर हाश्मी (वय २५, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार १९ वर्षीय तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी समीर हाश्मी हा तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. मात्र तरुणीने त्याच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिल्यानंतर आरोपी चिडला आणि तिचा छळ करण्यास सुरुवात केली.