सौजन्य - नवराष्ट्र टीम
ओतूर/मनोहर हिंगणे : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी सकाळी ट्रक आणि स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका २८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत झाला आहे. स्नेहल रवींद्र अहिनवे (रा. अहिनेवाडी, ता. जुन्नर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ३) सकाळी ११: २० ते ११:३० च्या सुमारास स्नेहल अहिनवे या आपल्या सासऱ्यांसोबत स्कुटीने मोनिका चौकातून जात होत्या. यावेळी कल्याणकडून ओतूरकडे येणाऱ्या एका भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, स्कुटीच्या मागील सीटवर बसलेल्या स्नेहल या रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि दुर्दैवाने ट्रकचे पाठीमागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यात त्यांना गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.
अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत स्नेहल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार भारती भवारी, शामसुंदर जायभाये, किशोर बर्डे, धनंजय पालवे, विश्वास केदार आणि ट्रॅफिक वॉर्डन शुभम काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून, पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या चौकात झालेल्या या भीषण अपघातामुळे ओतूर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहल यांच्या अकाली निधनाने अहिनवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात; चालकाचे नियत्रंण सुटले अन् थेट…
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात
जालन्यात समृद्धी महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कडवंची गावाजवळ हा अपघात झाला. कडवंची गावाकडून जालना शहराकडे येणाऱ्या मजुरांच्या पिक अपला मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या महिला समृद्धी महामार्गावर सफाईचे काम करत होत्या. काम आटोपून या महिला पिकअप व्हॅनमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव ट्रकने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, आठ महिलांनी जागेवरच प्राण सोडला.






