Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती
नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात आज 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण झाले. त्यानंतर लाल किल्ल्यावर प्रथमच ‘वंदे मातरम’ गायले गेले. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात याचा उल्लेखही केला. देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज आपण सर्वजण ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक घर तिरंग्यात आहे. आज प्रत्येक हृदय तिरंग्यात आहे.”
पंतप्रधान मोदींनी 80 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, “आज प्रत्येक हृदयाचे ठोके ‘वंदे मातरम’च्या लयीत धडकत आहेत. आज प्रत्येक घरात तिरंगा आहे आणि प्रत्येक मनात तिरंगा आहे. गेल्या काही दिवसांत देशातील काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा अनेक लोकांवर परिणाम झाला आहे. मी बाधित कुटुंबांना खात्री देतो की, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
ते पुढे म्हणाले, आज भारताचे 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे एक मोठे स्वप्न आहे. जेव्हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प करतो, तेव्हा तो आमच्या धैर्याचा परिचय ठरतो आणि जग आमच्याकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्यास भाग पडते.”
स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने देशाला प्रेरणा देतात
स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने आजही देशाला प्रेरणा देत आहेत आणि त्यांच्या आदर्शांपासून प्रेरित होऊन पुढे जाण्याचा निर्धार करणे अत्यावश्यक आहे.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
गेल्या 12 वर्षांत, देशातील असंख्य नागरिकांनी मग ते दलित, शोषित, उपेक्षित किंवा आदिवासी असोत; ग्रामीण किंवा शहरी भागातील रहिवासी असोत; गरीब किंवा मध्यमवर्गीय असोत; तरुण किंवा वृद्ध असोत; महिला किंवा पुरुष असोत; किंवा उत्तर, दक्षिण, पूर्व वा पश्चिम भागातील असोत, देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी अटळ निश्चय आणि समर्पणाच्या भावनेने शक्य त्या सर्व प्रकारे प्रयत्न केले आहेत. मी या प्रयत्नांची आदरपूर्वक दखल घेतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

