संग्रहित फोटो
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, केल्विन पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट केंद्रात नियुक्तीस आहेत. मंगळवारी (१८ ऑगस्ट) मध्यरात्री एकच्या सुमारास केल्विन हे तिकिट विक्री केंद्रात जमा झालेली रोकड घेऊन मुख्य कार्यालयात जमा करण्यास निघाले होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्यांना तिकिट विक्री केंद्राजवळ अडवले. त्यांच्या गळ्याला चाकू लावून तिकिट विक्री केंद्रात जाण्यास सांगितले. त्यांना मारहाण केली. केल्विन यांनी चोरट्यांना विरोध केला. झटापटीत चोरट्यांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ तोळ्यांची सोनसाखळी, खिशातील २६ हजार ६८५ रुपये, दोन मोबाइल संच असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला आहे. चोरट्यांनी जखमी अवस्थेतील केल्विन यांचे हातपाय बांधले. त्यांच्या तोंडात रुमाल कोंबला. त्यामुळे क्लेविन यांना आरडाओरडा करता आली नाही. जखमी अवस्थेतील केल्विन यांना तिकिट विक्री केंद्रात पडल्याचे पाहून प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
हे सुद्धा वाचा : व्हॉट्सअॅप स्टेटसवरून कोथरुडमधील अल्पवयीन मुलाचा खून; पार्टीसाठी बोलावले अन्…
व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला
व्यवसायासाठी एक लाख रुपये देण्यास नकार दिल्याच्या रागातून चुलतीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, त्यांच्या कानातील सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आले आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जखमी महिलेचे नाव गुणवंती सुरेश सुराणा (वय ६६) असे आहे. त्यांनी खडक पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांचा पुतण्या दिनेश जुगराज सुराणा (वय ५८) आणि फर्मान मन्सूर पारकर (वय २८) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






