
जुन्या गाडीच्या वादातून तरुणावर हल्ला, चाकूने सपासप वार; नांदेडमधील घटनेनं खळबळ
नांदेड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वजीराबाद मार्केट परिसरातील नॉव्हेल्टी दुकानासमोर जुन्या गाडीच्या वादातून एका २० वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना १० सप्टेंबर रोजी घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला वजीराबाद गुन्हे शोध पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे.
या हल्ल्यात अक्षय लक्ष्मण डुबुकवाड (वय २०, रा. नवीन हस्सापूर, भोई गल्ली, वाघी रोड, नांदेड) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वजीराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६४/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी कार्तिक भगवान भिसे (वय १८, रा. पंचशीलनगर, खडकपुरा, नांदेड) याला ताब्यात घेत अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ सप्टेंबर २०२६ पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक तुरनर करीत आहेत.
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. बोराटे हे माळेवाडी येथील कैलास धर्मा आल्हाट यांच्या पिकअपवर (एमएच १२ केपी ५६२६) चालक होते. ते रोज संकलित दूध घेऊन खर्डा येथे येत होते. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दूध घेऊन आले होते. काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना जातेगाव फाट्याजवळ बोलावून घेतल्याची माहिती आहे. जातेगाव फाट्याजवळ बोराटे आणि संशयितांत काही कारणावरून वाद झाल्याचे समोर आली आहे. बोराटे यांना मारहाण करताना एकाने त्यांच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने बोराटे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उज्ज्वलसिंह राजपूत यांनी पथके तयार करून शोधार्थ रवाना केले आहेत.