
लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा अली शेख यांच्यासह परळी येथील नगरसेवक खालेद शेख, अल्फाज पठाण आणि उमेर हे चौघे लातूरमध्ये आले होते. बुधवारी, दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाअकराच्या सुमारास बसवेश्वर कॉलेज ते खोरीगल्ली रस्त्यावरील हॉटेल उमेरा येथे चौघे जेवणासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात जोरदार वाद झाला. वाद वाढल्यानंतर चौघेही हॉटेलबाहेर रस्त्यावर आले. याच ठिकाणी बाबा अली शेख यांच्या छातीत तीक्ष्ण चाकूने वार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
जुना वाद; नियोजनबद्ध कटाचा संशय
बाबा अली शेख आणि संशयित आरोपींमध्ये गेल्या काही वर्षांपासून जुना वाद असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. त्यामुळे त्यांना परळीहून लातूरला आणण्यामागे पूर्वनियोजन होते का, या दिशेनेही पोलिस तपास करीत आहेत. मात्र, या शक्यतेची अधिकृत पुष्टी तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे.
परळीतील नगरसेवकासह तिघे संशयित फरार
या प्रकरणात परळीतील नगरसेवक खालेद शेख यांच्यासह अल्फाज पठाण आणि उमेर यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडल्यानंतर तिघेही पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेमागील नेमके कारण, हत्येचे पूर्वनियोजन होते का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत. लातूर शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या खुनामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.