
सिल्लोडमध्ये अज्ञात व्यक्तीचा गळा चिरून निघृण खून; घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर जप्त
सिल्लोड : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता सिल्लोडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिल्लोड शहरात बुधवारी (२९ जुलै) अज्ञात व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत व्यक्ती अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी आहे. त्याचा मृतदेह सिल्लोड-भोकरदन मार्गावरील एका पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीच्या संरक्षक भिंतीलगत आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळावरून रक्ताने माखलेला कटर तसेच सुमारे ५०० ते ६०० ग्रॅम वजनाचा सिमेंटचा तुकडा जप्त केला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध मार्गानी तपास करत आहेत.
या प्रकरणी सलीमपाशा चांदपाशा मोमीन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या हातावर ए. के. मीना असे गोंदलेले आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत काईगडे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक विजय राजपूत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यात दोन सख्ख्या भावांवर हल्ला
वैमनस्यातून भावंडांवर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना मार्केटयार्ड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर येथे घडली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशुतोष नाना क्षीरसागर (वय २७), ऋषीकेश नाना क्षीरसागर (वय २६, दोघे रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आरमान समीर शेख (वय २५), शाहरुख उर्फ कल्लू शेख (वय २७, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.