
'त्या' बेपत्ता तरुणाची आत्महत्या; खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पीयूष ओसवाल (वय २७, रा. वाई, जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पीयूष हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबतची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल होती. दरम्यान, बुधवारी दुपारी पुण्यातील कॅम्प परिसरातील मुकेश लॉज येथून बंडगार्डन पोलिसांना फोन आला. लॉजमधील एका खोलीतून तीव्र दुर्गंधी येत असून, दरवाजा उघडत नसल्याची माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा उघडल्यानंतर खोलीत पीयूष याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीतून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्याने त्याने एक ते दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पियुष हा मिसिंग असल्याची तक्रार वाई पोलीस स्टेशन येथे दाखल आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली. पीयूषचे वडील सराफ व्यवसाय करतात. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, बंडगार्डन पोलिस पुढील तपास करत आहेत.
धाराशिवमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
धाराशिव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव शहरातील बेगडा शिवारात एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. धनंजय तात्याराव राउत (३८ वर्षे, रा. एसटी कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय राउत यांचे लग्न शितल जगदीश राउत (वय ३४, रा. पुणे) हिच्याशी ठरले होते. मात्र संबंधित महिला दुसऱ्या व्यक्तीसोबत गेल्याने हे लग्न झाले नाही. त्यानंतर धनंजय राउत यांचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न होऊन त्यांचा संसार सुरू होता. असे असतानाही मागील पाच वर्षांपासून शितल राउत ही धनंजय यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळूनच धनंजय राउत यांनी बेगडा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.