पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्...
नायगाव : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे, धमकावणे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता मराठवाड्यातील नायगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीकडे वाईट नजरेने बघत असल्याच्या संशयावरुन 17 वर्षीय तरुणाचा मोटारसायकलवर नेहून बियर पाजून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिशान लतिफ सय्यद (17) आणि गावातीलच अब्बास शेख यांच्यात मोहर्रमच्या वेळी भांडणे झाली. त्यावेळी दोघांच्या नातेवाईकांनी भांडणाची सोडवा-सोडव केली होतो. त्यावेळी आब्बास याने जिशान हा त्याचे पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगून भांडण करत होता. त्यावेळी जिशान याला विचारले असता त्याने मी वाईट नजरेने पाहिले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे दोघातील वाद मिटला होता आणि दोघे मित्र झाले होते.
दरम्यान दिनांक 1 आक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता जिशान हा घराजवळील मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी गेला. नमाज झाल्यानंतर जिशान हा गावातील त्याचा मित्र आब्बास रमजानसाब शेखच्या मोटार सायकलवर बसून गेला होता. जिशान हा आब्बाससोबत जात असताना गावातील यादुला सलीम सय्यद, करीम चांद सय्यद, मोहम्मद वजीर सय्यद यांनी पाहिले होते. त्यानंतर रात्री साडेसात वाजता जावई रहिम महेबुब यांनी जिशानला घरी बोलण्यासाठी फोन केला असता जिशानने मी पेट्रोल आणण्यासाठी बाहेर आलो असून, घरी गेल्यानंतर फोन करुन देतो, असे म्हणून फोन कट केला.
हे सुद्धा वाचा : खंडणी प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरीत काँग्रेसच्या नेत्यासह दोघाना अटक
जिशान रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरातील सदस्यांना चिंता लागली होती. वडिलांनी शेख अब्बास यास फोन लावला असता मला काही माहित नसल्याचे सांगितले. अब्बास याने उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर 2 आक्टोबर रोजी सकाळी मुखेड पोलीस ठाणे गाठले व सदरचा प्रकार सांगितला असता मुखेड पोलिसांनी नायगाव तालुक्यातील गडग्याजवळ एक प्रेत सापडल्याचे सांगितले व फोटो दाखवले. फोटोमधील प्रेत हे जिशान सारखेच दिसत असल्याने रहिम महेबुब नांदेडे, सलीम शेख व अजीज शेख यांनी गडगा येथे जाऊन पाहिले व जिशान् असल्याची खात्री झाली. जिशानच्या डोक्यात दगडाने व छातीत चाकूने मारल्याचे दिसून आले. तसेच जिशानच्या अंगावरील कपडे व पोटावरील भाग अर्धवट जळाला असल्याचे दिसले. मयत जिशानच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून आरोपी आब्बास रमजानसाब शेख याला अटक केली आहे.