
सिंहगड रस्त्यावरील अपघातात तरुणीचा मृत्यू; पीएमपी बसमधून पडली अन् थेट...
पुणे : रहदारीचा रस्ता असलेल्या सिंहगड रोडवर भल्या गर्दीच्यावेळी विचीत्र अपघातात २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. भरधाव पीएमपी बसच्या समोरील दरवाजातून अचानक बाहेर पडल्याने पाठिमागून आलेल्या स्कूल व्हॅनच्या चाकाखाली तरुणी सापडली. स्कूल व्हॅनने तिला चिरडले. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. यादरम्यान, गर्दीच्या वेळीच ही घटना घडली आहे. हा अपघात पाहणाऱ्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. ही घटना सोमवारी सकाळी सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर घडली आहे.
कांचन बळवंत खड्डा (वय २५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बसचालक आणि स्कूल बसचालकावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे . दोन्ही चालकांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कांचन खड्डा ही मूळची राजस्थानमधील हनुमानगड येथील होती. तिने भारतीय तंत्रज्ञान संस्था, बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ती खडकवासला येथील संरक्षण प्रगत तंत्रज्ञान संस्था (डीआयएटी) येथे एमटेकच्या दुसऱ्या वर्षात सेमीकंडक्टर चिप डिझाइन विषयात शिक्षण घेत होती. या विषयात पीएच.डी. करण्याचे तिचे स्वप्न होते आणि त्यासाठी तिने तयारीही सुरू केली होती. कांचन डीआयएटी या परिसरातील कृष्णा हॉस्टेलमध्ये राहत होती. सोमवारी दिघी येथील डीआरडी लॅबमध्ये प्रात्यक्षिक असल्याने ती खडकवासला येथून पीएमपी बसने जात होती. सकाळी सुमारे पावणे दहाच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वूड प्लाझा दुकानासमोर ती बसच्या पुढील दरवाजातून खाली पडली. त्याचवेळी बाजूने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली ती आल्याने गंभीर जखमी झाली. जखमी कांचनला तत्काळ जगताप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.