नियमबाह्य फी म्हणून मागितली लाच
पुणे : सहा गुंठ्यात बांधलेल्या बंगल्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच घेताना मंडलाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. मंडलाधिकाऱ्याने लाच हातात न घेता स्वत:च्या गाडीत ठेवण्यास सांगितली. रक्कम गाडीत ठेवताच एसीबीच्या पथकाने छापा कारवाई करून त्याला रंगेहात पकडले.
सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६, रा. पिंपरी) असे पकडण्यात आलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत एसीबीकडे एका ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
माहितीनुसार, तक्रारदार हे वाल्हेकरवाडीत राहण्यास आहेत. त्यांनी ६ गुंठ्यात बंगला बांधला आहे. त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर करायची होती. त्यासाठी त्यांनी अर्ज केले होते. दरम्यान, सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी लोकसेवक जाधव यांनी त्यांच्याकडे प्रथम ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीत तडजोडीअंती साडे चार लाख रुपये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
मंगळवारी (दि. ४ मार्च) एसीबीने चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात सापळा रचला. तसेच, तक्रारदार यांच्याकडून जाधव यांनी ४ लाख रुपयांची लाच घेतली. लाचेची रक्कम हातात न घेता, त्यांनी स्वत:च्या कारमध्ये (क्रमांक- एमएच.१४.जेक्यू.८२८२) ठेवण्यास सांगितली. कारमध्ये रक्कम ठेवताच एसीबीच्या पथकाने छापा मारून जाधव यांना रंगेहात पकडले.
शेतकऱ्याकडून 25 हजारांची लाच घेणं भोवलं
गेल्या काही दिवसाखाली इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. तसेचं त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन २०२० पासून तहसीलदार यांच्याकडे दावा सुरू आहे. याबाबत तहसीलदार इंदापूर यांची सुनावणी होऊन निकाल देणे बाबतची प्रक्रिया बाकी होती. सदर निकालाची कागदपत्रे तक्रारदाराच्या बाजूने तयार करून द्यावे म्हणून कावेरी विजय खाडे (वय-४८ वर्षे) महसूल सहाय्यक वर्ग ३ तहसील कार्यालय इंदापूर, रा. संघवीनगर, भिगवन रोड, बारामती) यांनी ५० हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुरूप शुक्रवार (दि. २८) रोजी ५ वाजताच्या दरम्यान सापळा रचून संबंधित महसूल सहाय्यक कावेरी खाडे यांना २५ हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.