संग्रहित फोटो
नाशिक : मैत्रिणीला दिलेले पैसे परत मागणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दिलेले पैसे परत न देण्यासाठी तरुणीने भावांच्या मदतीने तरुणावर अश्लील फोटोंचे खोटे आरोप करत मारहाण करुन धमकी दिली. या त्रासाला कंटाळून वरुण भाऊसाहेब भामरे (वय २६, सध्या रा. ध्रुवनगर) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे वडील भाऊसाहेब भामरे (वय ५३) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आश्लेषा शिंदे हिने ओळखीचा फायदा घेऊन वरुणकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. वरुणने हे पैसे परत मागितले असता संशयितांची ते देण्याची नीती नव्हती. यातूनच १९ ऑगस्ट रोजी संशयित अक्षय कडलग आणि अविनाश गायकर यांनी वरुणला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तूच तिचे अश्लील फोटो तयार केलेस, तुला सोडणार नाही, तू मरून जा, अशी धमकी देत त्याला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त केले. दरम्यान, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपिंकडे गंगापूररोड पोलिस कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता? आणि मयत वरुण याने या प्रकरणाची माहिती कुणाला दिली होती का? याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.
अश्लील फोटोंच्या आरोपाची धमकी
तूच तिचे अश्लील फोटो तयार केलेस, तुला सोडणार नाही, तू मरून जा, अशी धमकी त्याला सतत दिली जात होती. पैसेही बुडाले आणि गंभीर आरोपांत अडकवण्याचा कट आखल्याचे लक्षात आल्याने खचलेल्या वरुणने गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) दुपारी घरात गळफास घेतला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आश्लेषा शिंदे व अविनाश गायकर यांना ताब्यात घेतले आहे, तर अक्षय कडलग पसार झाला आहे.
हे सुद्धा वाचा : भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन
पोलिस आयुक्त कर्णिकांच्या नावे सुसाईड नोट
आत्महत्येपूर्वी वरुणने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नावे चिठ्ठी लिहून न्यायाची साद घातली आहे. पैसे द्यावे लागू नयेत म्हणून त्यांनी माझ्यावर खोटा आरोप करून धमकी दिली. तिने प्रेमात फसवून पैसे काढून घेतले. हे मोठे लोक पैशाच्या जीवावर काहीही करू शकतात, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.






