
आम्ही इथले भाई आहोत, तुला इथून...; टोळक्याकडून तिघांना दगडाने मारहाण
ही घटना रविवारी (१८ जानेवारी) सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बापदेव वस्ती येथील ओमसाई नगर कॉर्नर येथे घडली आहे. या प्रकरणात प्रविण विष्णू कुंभार (४८, बापदेव वस्ती, मेदनकरवाडी) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सयश राजेंद्र यादव, शिवम संदीप हाके, शुभम संदीप हाके (१८, कडाची वाडी), चिन्मय वाघ, सुदर्शन चौधरी, सोन्या वाघमारे आणि विराज कृष्णा कड (२३, कडाचीवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील शुभम हाके आणि विराज कड या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुंभार हे रस्त्याने जात असताना आरोपींनी त्यांची गाडी अडवली. “आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसा काय चालला? तुला इथून जाऊ देणार नाही,” अशी धमकी देत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी फिर्यादीच्या दिशेने दगड फेकून मारला. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेले गणेश शेलार आणि प्रतीक शेलार यांच्या डोक्यावरही आरोपींनी दगड मारून त्यांना जखमी केले. या टोळक्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने आणि घरे बंद करून घेतली होती. दक्षिण चाकण पोलीस तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : ‘तिने मला सोडलं’ या रागातून प्रेयसीची केली हत्या, न्यायालयाने दिला कठोर निकाल