
स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
संबंधित ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले आहे. यापूर्वी उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करण्यात आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यातच गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजता गावात सार्वजनिक काम सुरू असताना व्हॉट्सॲप स्टेटसवरून दोन्ही गट आमनेसामने आले. बाचाबाची वाढत जाऊन सरपंचाच्या पतीने नितेश काकडे यांच्या कानशिलात लगावून धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर नितेश काकडे यांनी सहकाऱ्यांसह आळेफाटा पोलिस ठाणे गाठले आहे.
पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मारहाणीचे स्वरूप स्पष्ट होईल. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार तक्रार नोंदवून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
महिलांचा अवमान करणारी भाषा वापरल्याचा आरोप
दरम्यान, जखमी ग्रामपंचायत सदस्य नितेश काकडे यांनी सरपंच महिलेचा अवमान होईल, महिलांना लज्जा निर्माण होईल अशा शब्दांचा वापर केल्याचा आरोप सरपंच मेघा काकडे यांनी केला आहे. सरपंच महिलेचा सन्मान न ठेवता अशा प्रकारची भाषाशैली वापरणे कितपत योग्य आहे, असा सवाल सरपंच काकडे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, एकीकडे मारहाणीचा आरोप तर दुसरीकडे महिलांचा अवमान करणाऱ्या भाषेचा आरोप, अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासानंतर या प्रकरणातील नेमके तथ्य स्पष्ट होणार आहे.