
१२ वर्षाची मुलगी भावासोबत खेळत होती, दोघांनी दुचाकीवरून नेले अन्...; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
छत्रपती संभाजीनगर : घरासमोर लहान भावासोबत खेळत असलेल्या १२ वर्षीय मुलीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बळजबरीने दुचाकीवर बसवून नेल्याची घटना सावित्रीनगर परिसरात १ ऑक्टोबर रोजी रात्री घडली आहे. मुलीच्या आईने आरडाओरड केल्यानंतर प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी सिडको पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच मुलीची सुटका केली. या प्रकरणात दोन अल्पवयीन मुलांसह एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीनगर भागातील ३२ वर्षीय महिलेची १२ वर्षीय मुलगी आणि मुलगा १ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता घरासमोर खेळत होते. त्यावेळी दुचाकीवरून दोघे जण तेथे आले. त्यांनी मुलीला जबरदस्तीने दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसविले आणि तिला घेऊन तेथून निघून गेले. त्यांच्या मदतीला आणखी एक जण दुचाकीवरून मागोमाग गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीला जबरदस्तीने घेऊन जात असल्याचे लक्षात येताच तिच्या आईने ‘मुलीला वाचवा’ म्हणून आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत दुचाकीस्वार मुलीला घेऊन पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला.
गुन्हा दाखल होताच तपासाला वेग
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. विविध दिशांनी शोध घेतल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याच्या काही तासांतच पोलिसांना मुलीचा शोध घेण्यात यश आले. तिची सुखरूप सुटका करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : रिक्षातील प्रवाशाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले; 24 तासांत सराईत टोळी जेरबंद
तिघांना घेतले ताब्यात
मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून, एक जण तरुण आहे. या तिघांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. अपहरणामागील कारणासह घटनेतील अन्य बाबींचा तपास केला जात आहे.
जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटवरून आर्किटेक्टचे अपहरण
जमीन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला उशीर होत असल्याच्या कारणावरून एका आर्किटेक्टचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडून कोऱ्या चेकवर सह्या करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दुपारी १२:३० ते ३:३० वाजेच्या सुमारास रावेत येथील कन्नू की चाय रेस्टॉरंटजवळ ते विश्रांतवाडी दरम्यान घडली आहे. या प्रकरणात सूरज नाथाजी पाटील (वय ३१, रावेत, मूळ – पन्हाळा) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाकांत तिवारी (किवळे), मुस्सा गौस शेख (देहूरोड) आणि तिवारी यांचा कारचालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी मुस्सा गौस शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.