संग्रहित फोटो
पुणे : मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर चारचाकी चालक तरुणाची कार अडवून त्याच्याशी वाद घालण्याचा बहाणा करत चौघा चोरट्यांनी त्याला मारहाण केली आहे. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून तरुणाच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून चोरटे पसार झाले आहेत. ही घटना ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील बागणी येथील ३४ वर्षीय तरुणाने नऱ्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कारचालक असून तो आपल्या काकांसोबत कारमधून प्रवास करीत होता. दोघेही ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरून जात होते. त्यावेळी मार्गावर वाहनांची वर्दळ होती. याचवेळी एका वाहनातून आलेल्या चौघा आरोपींनी तक्रारदाराची कार अडवली. ‘गाडी बाजूला का घेतली नाही?’ असे म्हणत त्यांनी तरुणाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी चालक तरुणाला मारहाण केली.
दरम्यान, तक्रारदाराच्या काकांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता कारच्या आरशांची तोडफोड केली. त्यानंतर कारच्या खिडकीतून हात घालून चालकाच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि चौघेही वाहनातून पसार झाले.
हे सुद्धा वाचा : मतदार यादीत दुरुस्तीच्या बतावणीने ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
खिशातील एक हजारांची रोकड काढली; वानवडी पोलिसांत गुन्हा
वैदवाडी परिसरात तरुणाला हिसका मारून त्याच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेऊन आरोपी पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अली बागवान (रा. फुले वस्ती, हडपसर) याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुकेश लोरीक निषाद (वय ३०, रा. वेदूवाडी सिग्नल जवळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, दोन दिवसांपूर्वी दुपारी एकच्या सुमारास तक्रारदार त्रिलोक बार परिसरातून जात होते. त्यावेळी आरोपी अली बागवान याने त्यांना हिसका मारला. त्यानंतर त्यांच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि आरोपी तेथून पळून गेला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आरोपीचे नाव तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर तक्रारदाराने वानवडी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक मोकाटे पुढील तपास करीत आहेत.






