पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार; रात्री दारू पिऊन घरी आला अन्...
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार पेठेत कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विसर्जन सोहळा सुरू असताना शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ही घटना रात्री घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ४५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे.
अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अविनाश साप्ते यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश, त्यांची आई कुसुम व तक्रारदार आशिष हे शनिवार पेठेतील मेहुणपुरा भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. संपत्तीवरुन त्यांच्यात वाद सुरू आहेत. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. अविनाश शनिवारी (६ सप्टेंबर) रात्री दारू पिऊन घरी आला. त्याने आई कुसुम साप्ते यांच्याशी वाद घातला. त्यांचा चेहरा व डोक्यावर चाकूने वार केले. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. आजीला वाचविण्यासाठी आशिषने भांडणात मध्यस्थी केली. तेव्हा अविनाश यांनी त्याच्यावरही चाकूने वार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अविनाश साप्ते यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक कारके तपास करत आहेत.
गाडी न दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराने गाडी न दिल्याच्या रागातून लोखंडी पाईप एकाच्या डोक्यात मारला आहे. पाईप डोक्यात मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. निखिल नितीन घाडगे (वय 25 रा. साईनाथनगर भोनेमाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आशादुल्ला हारुण जमादार (वय 27 रा. अशोक सायझिंगमागे) याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जमादार याला कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असतानाही तो शहरात वावरत होता. ही घटना विसर्जन मिरवणूकीदरम्यान रात्री 9 वाजता घडली आहे.