जुन्या वादातून दोघांवर कोयत्याने हल्ला; सपासप वार केले अन्...
जेजुरी : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुरंदर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाल्हे (ता. पुरंदर) येथे जुन्या वादाचा राग मनात धरून आरोपी गणेश जगन्नाथ भुजबळ (रा. वरचा मळा, वाल्हे, ता. पुरंदर) याने दोघांवर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी आरोपी गणेश भुजबळ याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र पांडुरंग भुजबळ (रा. वरचा मळा वाल्हे )यांनी त्यांच्या मळ्यात जाण्यासाठी रस्ता मंजूर करून घेतल्याचा राग मनात धरून गणेश भुजबळ याने याच पाणंद रस्त्यावर सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान ट्रॅक्टर आडवा लावून रामचंद्र भुजबळ यांचा रस्ता अडवला. दरम्यान हातातील ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली.
यावेळी तेथे उपस्थित ओंकार अरविंद पवार (रा. अडाची वाडी, वाल्हे )हे भांडण सोडवण्यास गेले असता, त्यांच्यावरही कोयत्याने वार केले. त्याचबरोबर रामचंद्र भुजबळ यांचा मुलगा श्रेयस याने वडिलांना वाचवण्यासाठी आरोपी गणेश याला दगड मारल्याने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात रामचंद्र भुजबळ आणि ओंकार पवार हे गंभीर जखमी झाले. ही घटना २३ जून २०२५ रोजी घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. १) जखमी ओंकार पवार यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.