संग्रहित फोटो
पुणे : कोंढवा येथील उच्चभ्रु सोसायटीत घडलेल्या आयटी अभियंत्या तरुणीवरील अत्याचारप्रकरणाला वेगळेच वळण लागले असून, ‘तो’ कुरिअर बॉय नव्हता तर तिचा मित्रच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच तो घरात घुसला नसून, तो तिच्या सहमतीने घरी आला होता. तसेच, तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारलेला नसून, ती बेशुद्ध देखील झाली नव्हती, असेही समोर आले आहे. दरम्यान, तरुणीने नकार दिल्यानंतर देखील जबरदस्तीने बलात्कार केला, त्याचा तपास पुणे पोलिसाकंडून सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका २६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. कोंढव्यातील उच्चभ्रु सोसायटीतील २२ वर्षीय आयटी अभियंता तरुणीवर कुरिअर बॉय म्हणून आलेल्या एकाने बलात्कार केला. तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला व ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री समोर आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा नोंद केला होता. घरात घुसून बलात्कार झाल्याने शहरात याघटनेने खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनी पुर्ण ताकदीने तपास करून या गुन्ह्याचे ४८ तासाच्या सत्य बाहेर आणले. त्यामध्ये तरुण कुरिअर बॉय नव्हता, तर तिचा मित्रच असल्याचे वास्तव समोर आले आहे.
तिनेच फोटो एडिट केले
तरुणीसोबत फोटो काढून त्यावर मी पुन्हा येईन, छान वाटले. कोणाला काही सांगितल्यास हा फोटो व्हायरल करेल असा मजकूर टाकण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्हंटले होते. तरुणीच्याच मोबाईलमध्ये हे फोटो काढल्याचेही तिचे म्हणणे होते. पोलिसांनी या सर्व गोष्टींचा तपास केल्यानंतर तरुणीने मुळ फोटो ‘एडिट’करून त्यावर हा मजकूर टाकला. तर मुळ फोटो पोलिसांना मोबाईल देताना डिलीट केल्याची माहिती देण्यात आली.
तो यापुर्वी आला होता..!
तरुणी व संबंधित तरुण एक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. ते एकाच समाजातील असून, त्यांची परिचय मेळाव्यात भेट झाली होती. नंतर त्यांच्यात मैत्री झाली. दरम्यान, तो तरुण यापुर्वीही तिच्या फ्लॅटवर आल्याचे समोर आले आहे. पण, कोणाला समजू नये, यासाठी तो ‘डिलीव्हरी बॉय’ अशी नोंद सोसायटीच्या वहीत करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने अनेकवेळा तिला ऑनलाईन खाद्यपदार्थ देखील ऑर्डर केले होते.
असे शोधले तरुणाला
डिलीव्हरी बॉय म्हणून उच्चभ्रु सोसायटीत घुसून तरुणीवर बलात्कार झाल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात होता. पुणे पोलिसांनी ताकदीने तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे २०० कर्मचारी, स्थानिक पोलिसांचे ३०० कर्मचारी अशे ५०० कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिवस- रात्र करून जवळपास ७०० ते ८०० सीसीटीव्ही तपासले. त्यातून तरुण बाणेर भागात राहत असल्याचे समजले. त्यावरून त्याला पकडले
ती ओळखण्यास नकार देत होती
तरुणीला संशयित तरुणाचे फोटो दाखविले, पण ती हा नव्हे असे सांगत होती. परंतु, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून सर्व गोष्टी ‘क्लेअर’करून तरुणाला ताब्यात घेतले. तरुणीला जेंव्हा तरुण व त्याचा मोबाईल दाखविला, तेव्हा तिने ओळखले आणि घडलेला प्रकार मान्य केला. तो तिच्याशी बोलूनच तिच्या घरी आला होता. तसे मॅसेज व कॉल्स पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी संबंधित तरुण या सोसाटीत आला होता का, हे पाहण्यासाठी सर्व रहिवाशांचे जबाब नोंदवले होते.
संबंधित तरुण सातच्या सुमारास सोसायटीत आला आणि साडे आठच्या सुमारास बाहेर पडला असल्याचे दिसत आहे. तरुणीने रात्री दीडच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली. नंतर हा प्रकार समजला. तत्पुर्वी तरुणीला इन्स्टाला फॉलो करणारे व इतर मित्र, सहकारी अशा सर्वांकडे पोलिसांनी चौकशी केली होती.
बलात्काराचा तपास सुरू
तरुणीच्या म्हणण्यानुसार त्याने जबरदस्ती केली. त्यासंदंर्भाने पोलिसांकडून बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. स्प्रे किंवा डिलीव्हरी बॉय तसेच अश्लील फोटो व त्यावरील मजकूर हा तरुणीनेच रचलेला बनाव होता. त्यामुळे त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.