गुंतवणुकीच्या बहाण्याने आयटी अभियंत्याची फसवणूक; तब्बल 'इतक्या' लाखांना घातला गंडा
पिंपरी : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवून एका आयटी अभियंत्याची 48 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ऑगस्ट 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडली आहे. महेश राजेशाम बाले (38, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अन्या स्मित आणि इतर अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना एका व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन करून घेतले. त्यामध्ये फिर्यादी यांना गुंतवणुकीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कंपनीचे एक एप्लीकेशन डाउनलोड करून त्यामध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. इतर नागरिकांना गुंतवणुकीवर चांगला नफा झाल्याचे फिर्यादी यांना सांगितले. दरम्यान फिर्यादी यांनी केलेल्या गुंतवणुकीवर मोठी रक्कम जमा झाल्याचे खोटे दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादी यांनी गुंतवलेली रक्कम काढून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेत त्यांची एकूण 48 लाख 38 हजार 824 रुपयांची फसवणूक केली.
गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणूक
शेअर बाजारात गुंतवणुक केल्यास चांगला नफा देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेची ४० लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ६४ वर्षीय ज्येष्ठ महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कोंढवा भागात राहतात. १६ फेब्रुवारी रोजी चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्यांना दाखविले. महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. या रकमेवर त्यांना चांगला परतावा देण्यात आला. त्यामुळे त्यांचा विश्वास बसला. चोरट्यांनी त्यांना आणखी रकम गुंतविण्यास सांगितले. चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर गेल्या ५ महिन्यात महिलेने वेळोवेळी ४० लाख २० हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही, तसेच त्यांना मुद्दल दिली नाही. त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. नंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.