दारू पिऊन त्रास दिल्याचा राग अनावर; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काहीही काम धंदा न करता सातत्याने दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे लहान भावाचा मोठ्या भावाने चाकूने सपासप वार करून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बिबवेवाडी परिसरात घडला आहे. मोठ्या भावानेच लहान भावाचा खून केल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रवीण उर्फ ऋतिक दत्तात्रय नवले (वय २३, रा. अप्पर इंदिरानगर, गणेशनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ अनिकेत (वय २६) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण आणि अनिकेत सख्ये लहान भाऊ आहेत. प्रवीण लहान आहे. परंतु, त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पिल्यानंतर भावासह कुटूंबियाला त्रास देत असत. काही कामधंदा देखील करत नसे. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढला होता. तो सातत्याने त्रास देत होता. दरम्यान, घटनेच्यावेळी देखील त्याने दारू पिलेली होती. तो पुन्हा त्रास देऊ लागला. यावेळी रागातून मोठा भाऊ अनिकेत याने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. यात प्रवीण याचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अनिकेत याला ताब्यात घेतले. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.
हे सुद्धा वाचा : लिफ्ट मागणे बेतले जिवावर, भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; तरुणाचा जागीचं मृत्यू
पुण्यात हॉटेलमधील सुरक्षारक्षकावर हल्ला
दारू पिल्यानंतर बिल न देताच निघून जाणाऱ्या तरूणाच्या घरी हॉटेल कामगारांनी फोन करून बिलाची माहिती दिली. नंतर मात्र तरुणाने घरी का सांगितले याचा राग मनात धरत त्याच दिवशी संध्याकाळी पुन्हा हॉटेलमध्ये येऊन सुरक्षा रक्षकावर धारदार हत्याराने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील भोसले (रा. सातववाडी, हडपसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत राहुल शैलेश यादव (२७, रा. १५ नंबर, टेकडे पेट्रोल पंपवाजवळ, सम्राट हॉटेल, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार मुळचे उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून सध्या ते हडपसर येथील १५ नंबर परिसरात राहतात. तेथेच असलेल्या सम्राट हॉटेलमध्ये ते सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात.