२००० रुपयांसाठी कर्ज वसुली ॲप एजंट्सने पत्नीचे बनावट फोटो केले व्हायरल (फोटो सौजन्य-X)
अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे पैशांची तातडीची गरज निर्माण होते. त्यावेळी आपल्या ओळखीच्या अथवा जवळच्या नातेवाईकाकडून अपेक्षित रक्कम मिळेलच असे नाही. तसेच बँक,कर्मचारी सोसायटी अशा पर्यायांतून विनातारण कर्ज त्वरित मिळेलच असेही नाही. अशा वेळी गरजेपोटी लोक झटपट कर्ज इन्स्टंट लोन) हा पर्याय निवडतात. असे झटपट कर्ज देणारी बरीचशी अॅप्स मोबाईलवर उपलब्ध आहेत.ज्यामुळे अनेक तोट्यांना देखील सामारे जावं लागत. अशीच एक घटना आंध्र प्रदेशात घडली आहे.दोन हजार रुपयांच्या कर्जाला कंटाळून आंध्र प्रदेशातील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. कर्ज वसुली ॲप एजंट्सने तरुणाच्या पत्नीचे खोटे (Editing) अश्लील फोटो बनवून मित्र आणि कुटुंबीयांना पाठवली होते. या लज्जास्पद कृत्याला कंटाळून तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे कर्जवसुलीच्या चुकीच्या आणि गुन्हेगारी पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
25 वर्षीय नरेंद्रने 28 ऑक्टोबर रोजी आपल्या मैत्रिणीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केला होता. दोघेही विशाखापट्टणम येथे राहत होते. नरेंद्र हा व्यवसायाने मच्छीमार होता, मात्र खराब हवामानामुळे तो काही दिवस कामावर जाऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली.
आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नरेंद्रने ऑनलाइन ॲपवरून 2 हजार रुपयांचे कर्ज घेतले. काही आठवड्यांतच कर्जाची परतफेड करण्यासाठी ॲपच्या एजंटांनी त्याला त्रास देणे आणि शिवीगाळ करणे सुरू केले. यानंतर आरोपीने नरेंद्रच्या पत्नीचे एडिट केलेले फोटो तयार केले. आणि या फोटोवर किंमतही लिहिलेली होती. यानंतर अश्लील एडीट केलेले फोटो ऑनलाइन ॲपवरून नरेंद्रच्या कुटुंबाना आणि मित्रांना पाठवण्यात आले.
जेव्हा ही छायाचित्रे पत्नीच्या फोनवर पोहोचली तेव्हा तिने नरेंद्रला विचारले आणि त्यानंतर तिला कर्जाची माहिती मिळाली.दोघांनी मिळून संपूर्ण कर्ज फेडले, मात्र तरीही धमक्या आणि छळ सुरूच होता.काही दिवसांतच ओळखीच्या लोकांनी नरेंद्रला फोटोंबद्दल विचारायला सुरुवात केली. हे सर्व ऐकून तो पूर्णपणे तुटला. हा अपमान सहन न झाल्याने त्याने लग्नाच्या सहा महिन्यांनंतर मंगळवारी आत्महत्या केली.
आंध्र प्रदेशात आठवडाभरात घडलेली ही तिसरी घटना आहे. नंद्याल जिल्ह्यात एका तरुणीने ॲप एजंटच्या धमक्यांमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तिला वाचवले. ऑनलाइन कर्ज ॲप्स कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करून कर्ज प्रदान करतात. परंतु त्यांच्या कर्जवसुलीच्या अमानवीय पद्धतींवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता यांनी गेल्या महिन्यात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. अशी कर्जे वसूल करणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करेल, असे ते म्हणाले होते. हे ॲप्स कमी कागदपत्रांच्या नावाखाली सर्वसामान्यांना अडकवतात आणि नंतर अवैध मार्गाने त्यांचा छळ करतात. त्यांचा छळ एवढा गंभीर आहे की लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडले जात आहे.