फोटो - सोशल मीडिया
बदलापूर : सध्या राज्यामध्ये आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची चर्चा सुरु आहे. बदलापूरमधील शालेय विद्यार्थींच्या लैंगिक शोषण प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. अक्षयला भर चौकात फाशी देण्याची मागणी जनसमुदायाने केल्यानंतर आता पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये ठार झाला. अक्षयने पोलिसांच्या हातातून बंदूक हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारमध्ये अक्षयचा मृत्यू झाला. यामध्ये आता त्याच्या आईवडिलांनी टाहो फोडला आहे.
अक्षय शिंदेला बदलापूर प्रकरणी अटक केल्यानंतर देखील अक्षयचे आई वडील तो निर्दौष असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता त्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांवर अक्षयच्या आई वड़िलांनी गंभीर आरोप केले आहे. तसेच अक्षयचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षयचे आई वडील म्हणाले आहेत की, “आम्ही अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. आमच्या मुलाने साधे फटाके फोडले नाही. तो बंदूक खेचून गोळीबार कसा करू शकतो? शाळा प्रशासनाच्या दबावातून हे करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी आमची अक्षय याच्यासोबत तळोजा कारागृहात भेटही झाली होती. आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.” अशी स्पष्ट भूमिका अक्षयच्या आई वडीलांनी घेतली आहे.
अक्षय शिंदेची आई पुढे म्हणाली की, “अक्षयने मला जेलमध्ये एक मोठा पेपर दाखवला. यामध्ये काय आहे वाचून बघ असे तो म्हणाला. पण मला वाचता येत नाही. तो पेपर अक्षयच्या खिशात ठेवला होता. त्यामध्ये काय लिहलं होतं, माहिती नाही. मात्र, पोलिसांनीच तो पेपर मुद्दाम अक्षयच्या खिशात ठेवला असेल. त्या लोकांनीच मुद्दाम,हा पोरगा असं करुन घेणार, असे कागदावर काहीतरी लिहून, तो अक्षयच्या खिशात ठेवला असावा. त्या लोकांना अक्षयला मारायचं होतं, म्हणूनच त्याच्या खिशात ती पावती ठेवली असेल. पोलीस आता खोटं बोलत आहेत. त्यांना कोणीतरी पैसे दिले आहेत,: असा गंभीर आरोप अक्षयच्या आईने पोलिसांवर केला आहे.
एका वाहिनीला मुलाखत देताना अक्षयचे वडीलांनी पोलिसांवर पैसे घेतल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, “या प्रकरणात आणखी सहाजण आरोपी आहेत. पोलिसांनी त्यांना शोधलं नाही आणि आमच्या पोराला मारुन टाकलं. त्यांना वाचवण्यासाठीच आमच्या पोराला आले. आम्ही आता स्टेशनवर कचऱ्यात राहतो, तिथेच झोपतो. याप्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. तेव्हाच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ. अन्यथा आम्हालाही गोळ्या घालून ठार मारा, आम्ही मरायला तयार आहोत,” असे म्हणत अक्षयच्या आई वडीलांनी मुलाच्या मृत्यूमुळे टाहो फोडला.