
वांद्र्यात नशेचा धिंगाणा; हाताला जोरदार चावा घेतल्याने महिला पोलिसाचा हात रक्तबंबाळ, नेमके प्रकरण काय?
मुंबई : वांद्रे परिसरात माऊंट मेरी जत्रेदरम्यान दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालणाऱ्या २८ वर्षीय तरुणीने महिला पोलिसावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. गोंधळाची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या महिला पोलिसाच्या हाताला तरुणीने जोरदार चावा घेतला. या हल्ल्यात पोलिस महिला जखमी झाली. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निकी क्रिस जसिंग्टो (वय २८, रा. कलिना कोळीवाडा, सांताक्रूझ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माऊंट मेरी जत्रेदरम्यान ती दारूच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालत होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी रवाना झाले.
हेही वाचा: Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
२० सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१० वाजता वांद्रे मोबाइल-६ व्हॅनवर पोलिस कर्मचारी ड्यूटीवर होते. त्यावेळी चॅपल रोडवरील कार्मेल चर्चसमोर एक महिला गोंधळ घालत असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. महिलेविषयी तक्रार असल्याने महिला पोलिस यशोदा चौगुले यांच्यासह अन्य कर्मचारी घटनास्थळी गेले.
हेही वाचा: Crime News: शाळेत महिला शिक्षिकेवर गोळीबार; सीसीटीव्हीत ओढत नेताना आरोपी कैद
पोलिसांनी संबंधित तरुणीला गोंधळ थांबविण्यास सांगितले. मात्र, त्यावेळी ती आक्रमक झाली. तिने यशोदा चौगुले यांच्या हाताला जोरदार चावा घेतला. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर यशोदा चौगुले यांच्या तक्रारीवरून निकी क्रिस जसिंग्टो हिच्याविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.