सौजन्य फोटो - सोशल मिडीया
सम्पूर्णानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमेरनगर गावातील सैय्यद इलियास हे सध्या सौदी अरेबियात नोकरी करतात. सुमारे ११ वर्षांपूर्वी ते पत्नी, मुलगी निशात फातिमा आणि दोन मुलांसह लखीमपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी आरोपी सऊदच्या वडिलांचे घर भाड्याने घेतले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये ओळख झाली आणि निशात व सऊद यांचा संपर्क वाढला.
निशात फातिमा आणि सऊद अन्सारी यांनी चिल्ड्रन्स अकॅडमी स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेतले होते. दोघांनी याच शाळेतून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. शिक्षणादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर दोघे वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षणासाठी गेले.
सुमारे वर्षभरापूर्वी निशात फातिमा यांना याच चिल्ड्रन्स अकॅडमी स्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी मिळाली होती. नोकरी लागल्यानंतर त्यांनी सऊदशी संवाद कमी केल्याचे सांगितले जाते. त्याचदरम्यान निशात यांचे लग्न अन्यत्र ठरल्याची माहिती समोर आली. यामुळे सऊद नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ही घटना सकाळी सुमारे ११ वाजता घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपानुसार, सऊद अन्सारी बॅगेत तमंचा घेऊन शाळेत आला. त्याने निशात फातिमा यांना वर्गाच्या परिसरात गोळी मारली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेपूर्वीचा एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. त्यामध्ये सऊद अन्सारी निशात फातिमा यांना पकडून शाळेच्या पहिल्या मजल्याच्या दिशेने ओढत नेताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिस घटना घडण्यापूर्वी नेमक्या कोणत्या घडामोडी घडल्या, याचा तपास करत आहेत.
गोळीबाराचा आवाज ऐकून शाळेच्या परिसरात गोंधळ उडाला. शाळेत उपस्थित विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू करण्यात आला.
आरोपी शाळेच्या परिसरात कसा पोहोचला, त्याच्याकडे शस्त्र कसे आले आणि गोळीबारापूर्वी निशात व सऊद यांच्यात नेमके काय घडले, याचा तपास पोलिस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजसह उपलब्ध इतर पुरावे तपासले जात असून, घटनेमागील संपूर्ण क्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.






