
बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई; ट्रकची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या
ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणारे जनार्धन रघुनाथ रांधवन (वय-३१) यांचा (एम.एच.१४ डी. एम ९१८१) क्रमांकाचा टाटा ११०९ ट्रक हा (दि.२५ रोजी) सकाळी कल्याणी कंपनीसमोर पार्क केला होता. दुसऱ्या दिवशी (दि.२६ रोजी) सकाळी ते ट्रककडे गेले असता ट्रक सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खाली उतरून पाहणी केली असता बॅटरीची वायरी तुटलेल्या अवस्थेत व बॅटरी गायब असल्याचे आढळले. त्यांनी तत्काळ परिसरात शोध घेतला, मात्र बॅटरीचा काहीच मागमूस न मिळाल्याने त्यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चोरी गेलेली बॅटरी सुमारे दहा हजार रुपये किमतीची आहे. तक्रार नोंदताच पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले.
आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
सीसीटीव्ही फूटेज, परिसरातील हालचाली आणि मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित शिवम प्रेमप्रकाश यादव (रा. घाडगे वस्ती, एमआयडीसी बारामती) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने ट्रकची बॅटरी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली बॅटरी हस्तगत केली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अधिकारी, कर्मचाऱ्यांची कारवाई
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलिस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलिस अंमलदार सुरेंद्र वाघ, अमोल पवार, भारत खारतोडे यांनी केली आहे.