सौजन्य फोटो - सोशल मीडीया
अहिल्यानगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख आणि सुमैय्या शेख या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब मुंबईतील मालवणी येथील असल्याची माहिती आहे. शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगर येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी कारने येत होते. भाळवणी शिवारात त्यांच्या कारला आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. स्थानिक नागरिकांनी जखमींना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी चौघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पारनेर पोलिसांकडून तपास सुरू आहे.
भंडाऱ्यात महिला आणि चिमुकल्यांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली तालुक्यातील पिंपळगावजवळ आयशर आणि ट्रॅक्स वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत छत्तीसगडमधून नागपूरकडे जाणाऱ्या सहा महिला आणि तीन बालकांचा मृत्यू झाला. सुरुवातीला आठ जणांचा मृत्यू झाला होता. उपचारासाठी नागपूरला नेत असलेल्या आणखी एका महिलेचा वाटेत मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा नऊवर पोहोचला. मृतांमध्ये ५५ वर्षीय एका महिलेसह बहुतांश महिला ३५ वर्षांच्या आसपासच्या आहेत. तीनही बालके पाच वर्षांखालील आहेत. तिज उत्सवासाठी महिला आपल्या माहेरी नागपूरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. वाहनांमध्ये १६ ते १७ जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना भंडारा आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. वाहन चालक या अपघातातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
नांदेडमध्ये आठ जणांचा मृत्यू
नांदेड-भोकर मार्गावर गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. पांडुरंग लिंगू वाघमारे, लक्ष्मीबाई वाघमारे, सय्यद अल्तमेश सय्यद अलीमोद्दीन, शेख फिरोज, बलवान पवार, शाहीद सौदागर आणि कृष्णा पवार अशी मृतांची नावे असून, आणखी एका मृताची ओळख पटणे बाकी आहे. सात जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिन्ही घटनांचा संबंधित पोलिसांकडून तपास सुरू आहे.






