crime (फोटो सौजन्य: social media )
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या 2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलिसांनी 16 लाख रुपयांची रोकड, 87 वाहने आणि 62 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई सांगोला तालुक्यातील मोठी कारवाई आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
कशी टाकली धाड?
सांगोला तालुक्यातील सोनंद येथील ‘हॉटेल मटन भाकरी’ मध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर सांगोला पोलिसांचे विशेष पथक तयार करून पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. पोलीस आल्याचे समजताच जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कडव्या बंदोबस्तामुळे त्यांची पळापळ निष्फळ ठरली. पोलिसांच्या या अचानक धडकेने जुगार अड्ड्यावर एकच गोंधळ उडाला.
एकूण किती मुद्देमालाची किंमत जप्त?
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 16 लाख रुपयांची रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी आलेल्या 24 चारचाकी आणि 61 दुचाकींसह एकूण 87 वाहने आणि 62 मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत 2.65 कोटी रुपये आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ही कारवाई यशस्वी केली. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी; सुरक्षा रक्षकाचे हात- पाय बांधले अन्…
वाकडेवाडीतील नामांकित दुचाकीच्या शोरुममधील सुरक्षा रक्षकाला कटरचा धाक दाखवून व त्याचे हातपाय बांधुन शोरुममधील ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटणारा चोरटा शोरूममधीलच कामगार निघाला आहे. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने बेड्या ठोकल्या आहेत. प्रतिक भारत सावंत (वय २३, रा. सुळे पीजी महर्षीनगर, गुलटेकडी) असे चोरट्याचे नाव आहे.
प्रतिक हा याच शोरुममध्ये स्टोअर किपर म्हणून काम करतो. त्यानेच सुरक्षा रक्षकाला धाक दाखवून पैसे चोरुन नेले होते. दरम्यान, आपला हा रोकड चोरीचा प्रकार कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून दोन दिवस तो कामावर आला होता. त्यानंतर त्याने चार दिवस सुट्टी घेतली होती. याबाबत शोरुमच्या जनरल मॅनेजर यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदुम व त्यांच्या पथकाने केली.