
Crime News: ‘दृश्यम’ पाहून वडिलांच्या हत्येचा कट; एक फोन कॉल ठरला घातक, मुलगा पोलिसांच्या जाळ्यात
समस्तीपूर : बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात ‘दृश्यम’ चित्रपटाच्या धर्तीवर वडिलांच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरबां गावात रघुवीर सहनी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा शिवशंकर याला सुरतमधून अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जमिनीचा वाद आणि पत्नीला वडिलांनी शिवीगाळ केल्याच्या रागातून शिवशंकरने हत्येचा कट रचला. त्यासाठी त्याने ‘दृश्यम’ चित्रपटातील कल्पनेचा आधार घेत पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
शिवशंकर हा कुटुंबासह सुरतमध्ये राहत होता. तो सुरतहून ट्रेनने बिहारला आला. पाटणा-हाजीपूर मार्गे पटोरी स्थानक गाठल्यानंतर ऑटोने काही अंतर प्रवास केला आणि त्यानंतर सुमारे चार किलोमीटर पायी चालत रात्रीच्या अंधारात गाव गाठले. २६ जुलैच्या मध्यरात्री तो घराच्या मागील दरवाजातून आत शिरला. त्यानंतर कोठारातून कुऱ्हाड घेत बाहेर झोपलेल्या वडिलांवर त्याने वार केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर तो त्याच रात्री पुन्हा पसार झाला आणि सुरतला परतला.
पुरावा मागे न ठेवण्याचा प्रयत्न करूनही शिवशंकरची एक चूक त्याला महागात पडली. मोबाईल बंद ठेवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवशंकरने पटोरी स्थानकावर पोहोचल्यानंतर पत्नीला फोन करण्यासाठी काही वेळ मोबाईल सुरू केला. तांत्रिक तपासात त्याचे लोकेशन त्याच रात्री पटोरी येथे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सुमारे ३६ तासांनी त्याचे लोकेशन सुरतमध्ये आढळले. वडिलांच्या मृत्यूनंतर तो श्राद्धालाही आला नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत सुरत गाठले आणि शिवशंकरला अटक केली. जमिनीचा वाद, पत्नीला झालेली कथित शिवीगाळ आणि हत्येचा कट याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.