संग्रहित फोटो
अहिल्यानगर : शहरातील गजबजलेल्या बालिकाश्रम रोड परिसरात सायंकाळच्या सुमारास ५५ वर्षीय व्यक्तीवर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. रविंद्र रामभाऊ चव्हाण (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र चव्हाण हे बालिकाश्रम रोड परिसरात असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. रस्त्यावर हा प्रकार घडल्याने नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत चव्हाण यांना उपचारासाठी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचाराचे प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती सुधारली नाही. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली. दरम्यान, आमदार संग्राम जगताप यांनीही जिल्हा रुग्णालयात धाव घेत परिस्थितीची माहिती घेतली आणि संबंधितांशी चर्चा केली.
हेही वाचा: ‘भूत काढण्याच्या’ बहाण्याने अघोरी विधी; फलटणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हल्ल्यात वापरण्यात आलेले शस्त्र आणि इतर पुरावे मिळविण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच बालिकाश्रम रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. आरोपी हल्ल्यानंतर कोणत्या दिशेने पसार झाला, याचाही शोध घेतला जात आहे. रविंद्र चव्हाण यांच्यावर नेमका कोणत्या कारणातून हल्ला करण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास पोलीस करत आहेत. गजबजलेल्या परिसरात सायंकाळच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.






