फोटो सौजन्य - सोशल मडीया
अश्विनींसह दोन मुलांचा मृत्यू
अश्विनी पौळ या निलंगा तालुक्यातील पौळ आंबुलगा येथील रहिवासी होत्या. गुरुवारी दुपारी त्या नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुज परिसरात तीन मुलांसह गेल्या होत्या. त्यानंतर घडलेल्या घटनेत अश्विनी आणि त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर एका मुलीवर उपचार सुरू आहेत.
सासरच्या जाचाला घेतलं कंटाळून टोकाचे पाऊल
या घटनेनंतर अश्विनी यांच्या माहेरच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. अश्विनी यांचे वडील तानाजी मोहिते यांनी पती, सासू आणि सासरे यांच्या कथित जाचाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप केला आहे.
तीन महिने माहेरी होती तरीही फोनवरून त्रास
मोहिते यांच्या म्हणण्यानुसार, अश्विनीला सासरच्या मंडळींकडून वारंवार फोन केले जात होते. फोनवरून तिच्यावर मानसिक दबाव आणला जात होता, तसेच धमक्याही दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, अश्विनी मागील तीन महिन्यांपासून माहेरी राहत होती. मात्र, माहेरी आल्यानंतरही फोनवरून तिच्याशी संपर्क साधून कथित त्रास दिला जात होता, असे वडिलांनी सांगितले.
मागील आठ दिवसांत नेमकं काय घडलं? वडिलांचा संशय
मागील आठ दिवसांत अश्विनीशी काहीतरी बोलले गेले असावे, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली असावी, असा संशयही वडिलांनी व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वडिलांनीच दिले कुस्तीचे धडे
अश्विनी पौळ यांच्या कुस्तीच्या प्रवासात त्यांचे वडील तानाजी मोहिते यांचा मोठा वाटा होता. शिक्षक असलेल्या मोहिते यांनी मुलीची कुस्तीतील आवड लक्षात घेऊन तिच्या सरावासाठी घराजवळच व्यवस्था केली होती. लहानपणापासून त्यांनी अश्विनीला कुस्तीचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये नाव कमावलेल्या अश्विनी यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांसह क्रीडा क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, वडिलांनी केलेले मानसिक छळ आणि धमक्यांचे आरोप गंभीर आहेत. या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, तसेच या प्रकरणात नेमकी काय पार्श्वभूमी होती, हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणार आहे. एफआयआरनंतर पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






