वडगाव मावळमध्ये दुचाकीची चोरी होत असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली (फोटो - सोशल मीडिया)
Maval Crime News : वडगाव मावळ : सतिश गाडे : वडगाव नगरपंचायत हद्दीत दुचाकी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, गेल्या दोन महिन्यांत शहरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी पुन्हा एकदा अशीच घटना घडली असून, वडगाव फाटा परिसरातून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना बुधवार, दि. ७ रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
विशेष म्हणजे दुचाकी चोरी करताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, सध्या पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. वडगाव नगरपंचायत हद्दीतील वडगाव–तळेगाव फाटा परिसरात असलेल्या आदित्य वर्धन हाइट्स इमारतीसमोर बजाज पल्सर २२० (एमएच १४ डीवाय ११८०) ही दुचाकी पार्क केली होती. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही दुचाकी चोरीला गेली. सदर चोरीची घटना त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे देखील वाचा : काका-पुतण्या पुन्हा एकत्र येणार का? अजित पवार यांच्या सुचक वक्तव्याने महायुतीला फुटला घाम
यापूर्वीही दुचाकी चोरीच्या घटना
वडगाव मावळ नगरपंचायत हद्दीत गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्याची नोंद आहे. वडगाव फाटा, बाजारपेठ परिसर, बसस्थानक परिसर तसेच सोसायटी परिसरातून रात्री व पहाटेच्या सुमारास दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, काही घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असतानाही चोरट्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
टाकवे येथे हुक्का फ्लेवर्ड तंबाखू उत्पादनावर FDA ची धाड
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादनावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई करत मावळ तालुक्यातील टाकवे गाव येथील मे. सोएक्स इंडिया प्रा. लि. या कंपनीवर धाड टाकली. या कारवाईत तब्बल ३१ कोटी ६७ लाख २१ हजार ९८७ रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला असून संपूर्ण आस्थापना सील करण्यात आली आहे. ही कारवाई दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.१५ वाजता FDA च्या विशेष भरारी पथकाने केली. सहायक आयुक्त (अन्न) भंडारा पथक प्रमुख श्री. यदुराज दहातोंडे यांच्या आदेशानुसार ही तपासणी करण्यात आली. कारवाईदरम्यान सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशिक्षणार्थी अधिकारी व पंच साक्षीदार उपस्थित होते.
निकोटीन आढळल्याने उत्पादन बेकायदेशीर
यापूर्वी १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या हुक्का फ्लेवर्ड तंबाखूच्या नमुन्यांच्या तपासणी अहवालात निकोटीन आढळून आल्याने हे उत्पादन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले. अन्न विश्लेषकांच्या अहवालानुसार हे उत्पादन अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ तसेच आयुक्त, अन्न सुरक्षा, महाराष्ट्र राज्य यांच्या १६ जुलै २०२५ च्या अधिसूचनेचे उल्लंघन करणारे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.






