
दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
Delhi Crime: जगभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशीच एक घटना दिल्लीतून समोर आली आहे. दिल्लीतील स्वरूप नगर परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एवढचं नाही तर, मुलीचा मृतदेह 13 सप्टेंबर रोजी कुशक रोड परिसरातील एका शेतात अत्यंत कुजलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणात तीन अल्पवयीनांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांनी शेतात एक मृतदेह असल्याची माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला त्याची ओळख पटवणेही कठीण झाले होते. मृतदेहाचा काही भाग भटक्या कुत्र्यांनी विद्रूप केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. मात्र तपासानंतर मृत व्यक्ती अल्पवयीन मुलगी असल्याचे समोर आले.
जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार पीडित मुलगी आणि संशयित आरोपी एकमेकांच्या परिचयाचे होते. ती आरोपींसोबत एका टेम्पोमध्ये गेल्याचे तपासात समोर आले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर मृतदेह शेतात टाकण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी नसल्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. तपास पथकांनी परिसर आणि आजूबाजूच्या मार्गांवरील 50 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यामध्ये घटनेच्या कालावधीत एक टेम्पो संशयास्पदरीत्या फिरताना आढळला.
अंधारामुळे वाहनाचा नोंदणी क्रमांक सुरुवातीला स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या CCTV फुटेजच्या आधारे टेम्पोच्या हालचालींचा माग काढला. अखेर संशयित वाहनाचा शोध लागल्यानंतर चालकाची चौकशी करण्यात आली आणि तपास पुढे सरकला.
या तपासातून तीन अल्पवयीनांसह चार जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी एका प्रौढ आरोपीची ओळख शिवम उर्फ सुदामा अशी सांगितली आहे. अन्य तीन संशयित अल्पवयीन असल्याने त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणात वापरण्यात आलेले दोन चाकू, आरोपींनी घटनेच्या वेळी परिधान केलेले असल्याचा संशय असलेले कपडे आणि टेम्पो जप्त केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा नेमका घटनाक्रम, प्रत्येक संशयिताची कथित भूमिका आणि फॉरेन्सिक तसेच तांत्रिक पुरावे यांची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.