विकासकाची १.६१ कोटींनी फसवणूक (संग्रहित फोटो)
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात फसवणुकीच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता नागपुरातील झुडपी जंगलातील राखीव जमीन स्वतःची असल्याचा दावा करत एका कुटुंबातील तीन सदस्यांनी विकासकाला १.६१ कोटी रुपयांनी फसवल्याची घटना बेलतरोडीत घडली. यामध्ये पोलिसांनी तीनही आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये मौदा येथील भेंडाळा तारसा येथील रहिवासी रामनाकर कोरपती (वय ५४), मधुकर कोरपती (वय ५७) आणि श्रीनिवास कोरपती (वय ५३) यांचा समावेश आहे. मनीषनगर येथील राजेश्वर पार्क येथील रहिवासी मोतीलाल चौधरी (वय ४६) यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. चौधरी यांची अलायन्स रियल्टी नावाची फर्म असून, मोतीराम पटले आणि श्रीहरी चौधरी त्यांचे भागीदार आहेत. चौधरी यांची ऑगस्ट २०२३ मध्ये गौरीशंकर इटनकर नावाच्या प्रॉपर्टी डीलरमार्फत कोरपती कुटुंबाशी ओळख झाली.
दरम्यान, कोरपती यांनी चौधरींना नागपूर ग्रामीणमधील मौजा वरोडा येथील ४.०८ हेक्टर जमीन विकायची असल्याचे सांगितले. चौधरी यांनी भागीदारांसह जमिनीची पाहणी केली व कोरपती कुटुंबियांसोबत १३.४४ कोटी रुपयांचा करार झाला. ऑगस्ट २०२१ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान, चौधरी यांनी वेळोवेळी आरोपींना १.७१ कोटी रुपये दिले आणि टोकन पत्रे दिली. त्यानंतर चौधरी यांनी कोरपती कुटुंबाला जमिनीची नोंदणी करण्यासाठी वारंवार आग्रह केला. मात्र, तिघेही टाळाटाळ करू लागले.
अधिक चौकशी केली असता फुटले बिंग
निराश होऊन चौधरी यांनी सरकारी कार्यालयांमध्ये जमिनीची चौकशी केली असता ही जमीन झुडपी जंगलात येत असल्याचे आणि आरोपींना याबाबत माहिती असल्याचे त्यांना समजले. लगेचच चौधरी यांनी त्यांचे पैसे परत मागितले, तेव्हा कोरपती यांनी १० लाख रुपये परत केले, पण उर्वरित रक्कम परत करण्यास त्यांनी टाळाटाळ सुरू केली. अखेर, निराश होऊन चौधरी यांनी पोलिसांकडे तक्रार केली. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.