आंतरजातीय विवाहाच्या रागातून मुलाच्या कुटुंबास मारहाण; धमकीही दिली अन्...
नाशिक : आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता असतानाही समाजातील भेदाभेदाची मानसिकता आजही संपलेली नाही. अशीच एक घटना नाशिक-पुणे रस्त्यावरील जनरल वैद्यनगरात घडली. सवर्ण समाजातील मुलीने बहुजन वर्गातील तरुणाशी आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून तिच्या कुटुंबीयांनी संबंधित मुलासह कुटुंबास धमकावत मारहाण केल्याची फिर्याद मुंबई नाका पोलिसांत दाखल झाली असून, त्यासंदर्भाने बीएनएस कलमांसह अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक जगन्नाथ सोनवणे (वय ६७, रा. श्याम सदन, वृंदावन कॉलनी, जनरल वैद्यनगर, द्वारका, नाशिक) यांनी फिर्याद नोंदविली आहे. ते सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी असून, त्यांचा मुलगा नितीन याने सवर्ण समाजातील तरुणीशी आंतरजातीय प्रेमविवाह केला आहे. दरम्यान, ३० सप्टेंबर ते १६ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुलीचे वडील संशयित कैलास जाधव यांनी नवविवाहित नितीनसह त्याच्या आईस फोन करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर, या कालावधीत अशोकामार्ग सिग्नल येथे सार्वजनिक रस्त्यावर कैलास जाधव यांनी सोनवणे यांची गाडी अडवून त्यांच्या नवविवाहित सुनेला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला.
हेदेखील वाचा : Indoli Accident: तरुण कामगाराचा ट्रॅक्टरच्या धडकेत मृत्यू; इंदोलीत ग्रामस्थांचा संताप, ८ तास ‘चक्काजाम’ !
त्याचवेळी जातिवाचक बोलून अर्वाच्च भाषा वापरली. दरम्यान, जाधव यांच्या कुटुंबातील संशयित संदीप नामदेव जाधव, उज्ज्वला संदीप जाधव, शालिनी संदीप जाधव, यश संदीप जाधव, अक्षय राजेंद्र घुमरे (सर्व रा. एसएससडी नगर, हिरावाडी, पंचवटी) व इतरांनी संगनमताने सोनवणे यांची इर्टिगा कारच्या (क्र. एमएच १५ जीए ७३१२) पुढील व मागील काचा फोडल्या.
याच दरम्यान, सोनवणे यांच्या घराबाहेरील झाडाच्या कुंडी गेटच्या आत फेकून घराची डेकोरेटिव्ह दिवे फोडून नुकसान केले. दाखल फिर्यादीनुसार, पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सरकारवाडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधाकर सुराडकर करत आहेत. संशयितांना ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुंबईनाका पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांतर्फे पुढील कायदेशीर कारवाई सुरू
संबंधित तरुण-तरुणीने प्रौढ वयात संमतीने आंतरजातीय विवाह केला आहे. मात्र, हा विवाह तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेला धक्का देणारा असल्याचे सांगत कुटुंबियांनी तीव्र विरोध दर्शविला. या घटनेने आंतरजातीय विवाहांभोवती असलेली असहिष्णुता उघड केली असून, शिक्षण, शहरीकरण आणि आधुनिकतेच्या गप्पा होत असतानाही जातीच्या चौकटी अजूनही किती घट्ट आहेत, याचे हे वास्तव उघड झाले आहे.






