anjali damania press Allegations that walmik Karad will join BJP party political news
बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. या घटनेनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस उलटले आहेत. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर इतर सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचेही आरोप आहेत. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असला तरी दिवसेंदिवस वाल्मिक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. अशातचं आता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
देशमुख नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे आमच्या आंदोलनासोबत ते सहभागी होणार आहेत. आरोपींना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते, अशी माहिती आमच्याकडे आली आहे मात्र त्याची खात्री करत आहोत पण संशय आहे. आरोपींना जेलमध्येही कोणीतरी जाऊन भेटत आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले. तसेच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरही सरकारच्या वतीने कोणीही वरिष्ठ अधिकाऱ्याचे शिष्टमंडळ भेटायला आले नाही. केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भेटायला आले, अशी खंतही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता – जरांगे
मनोज जरांगे यांनी बीडच्या मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्यांना अटक करण्यात आली नाही असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही तर शांत बसणार नाही असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला. मंत्री म्हणून धनंजय मुंडेंना आरोपी केलं जात नाही का? असा सवालही जरांगेंनी केलाय.
कृष्णा आंधळे कुठे बसलाय लपून?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला आता 2 महिने झालेत. हत्येप्रकरणी पोलीस, सीआयडी पथकं तपास करतायेत. हत्या प्रकरणानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले, आंदोलनं झाली. मात्र देशमुख कुटुंब अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला दोन महिने पूर्ण झाले, तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आंधळेच्या बेपत्तेपणावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.