photo credit- socoal media सुरेश धसांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचा पलटवार
बीड: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपानंतर मोठी राजकीय खळबळ उडाली. धस यांनी या हत्येच्या मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचे थेट संबंध माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी असल्याचा दावा केला होता. या प्रकरणावर सातत्याने होणाऱ्या टीकेमुळे अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतरही सुरेश धस आपले पत्ते उघडताना दिसत आहे.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या आईने परळी सोडून नाथ्रा गावी राहण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला. पण यावर धनंजय मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, “माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप करणाऱ्यांना मी सहन करणार नाही. अशा निराधार दाव्यांवर गप्प बसणे शक्य नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. तसेच, “राजकारण इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे, याचे वाईट वाटते,” असेही त्यांनी नमूद केले.
Suresh Dhas : “वाल्मिक कराड घरगडी होता अन् त्याचा मालक…”; सुरेश धस यांचा पुन्हा खबळजनक दावा
सुरेश धस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नवे आरोप करत, कृषी खात्यातील २०० कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडे तक्रार दाखल करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच, “धनंजय मुंडे यांच्या वागणुकीला कंटाळून त्यांची आई परळी सोडून नाथ्रा गावी राहायला गेल्या” असा दावा त्यांनी एका मुलाखतीत केला.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वस्तुस्थिती स्पष्ट केली. “परळी वैजनाथ येथील माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून मी आणि माझे कुटुंब नाथ्रा येथील शेतातील घरी राहत आहोत. ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुंडे यांनी सुरेश धस यांच्यावर दुटप्पीपणा आणि खोटे आरोप करण्याचा आरोप करत, “ज्यांनी आरोप केले, त्याच लोकांनी यापूर्वी मी शेतातील घरात राहतो, असे सांगितले होते. मात्र, आता केवळ माझी आई तिथे राहते असे भासवले जात आहे, हे हास्यास्पद आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
धनंजय मुंडे यांनी या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया देत “माझ्या आईबद्दल खोटे आरोप करणाऱ्यांना मी सोडणार नाही” असा इशारा दिला आहे. तसेच, “राजकारणाच्या पातळीवर चर्चा करण्याऐवजी कुटुंबीयांना गोवले जात आहे, हे अत्यंत खेदजनक आहे” असेही त्यांनी म्हटले आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असून, ईडीच्या तक्रारीनंतर मुंडेंना चौकशीला सामोरे जावे लागते का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.