
Dombivli Crime News: 'तुझा अजून संसार नाही झाला...' म्हणून मृतदेह लपवला; पण मनाच्या भीतीने आरोपीला करावे लागले आत्मसमर्पण...
विशाल कदम असे मृत तरुणाचे नाव असून, प्रभू करकडे असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रभू करकडे याच्यासह मृतदेह लपवण्यास मदत करणाऱ्या घरमालक संदीप म्हात्रे या दोघांनाही अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठागाव परिसरात मृत विशाल कदम आणि आरोपी प्रभू करकडे हे दोघे एकाच घरात दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. मद्यप्राशन सुरू असतानाच त्यांच्यात कोणत्याही एका क्षुल्लक कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात प्रभू करकडे याने विशाल कदम याची हत्या केली.
आपल्या हाताने खून झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रभूने घाबरून जाऊन घरमालक संदीप म्हात्रे याला हा सगळा प्रकार सांगितला. त्यावर घरमालक संदीपने, “तुझे तर अजून लग्नही झाले नाही, तुझे आयुष्य उद्ध्वस्त होईल,” असे म्हणत गुन्ह्याची वाच्यता न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर या दोघांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने विशालचा मृतदेह एका गोणीत कोंबून खाडीकिनारी एका निर्जन ठिकाणी नेऊन फेकून दिला.
पोलिसांना या घटनेची कोणतीही कुणकुण लागली नव्हती. मात्र, हत्येचे पाप आणि मनातील भीतीमुळे आरोपी प्रभू करकडे याला तब्बल २० दिवस गाढ झोप लागली नाही. खून झालेला मित्र विशाल कदम वारंवार त्याच्या स्वप्नात येऊ लागला, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली आला. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर त्याने क्राईम ब्रँच पोलिसांकडे धाव घेतली.
पोलिसांसमोर पोहोचल्यानंतर त्याने घडलेला सर्व घटनाक्रम प्रामाणिकपणे कथन केला आणि हत्येची कबुली दिली. क्राईम ब्रँचने तातडीने कारवाई करत प्रभू करकडेला ताब्यात घेतले आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी विष्णुनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. विष्णुनगर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी प्रभू करकडे आणि मृतदेह लपवण्यास मदत करणारा घरमालक संदीप म्हात्रे या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. दारूच्या नशेत झालेल्या या खूनाने डोंबिवली परिसरात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
Ans: ही घटना डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव परिसरात घडली आहे.
Ans: हत्या केल्यानंतर २० दिवस आरोपी प्रभू करकडे याला झोप लागली नाही आणि मयत मित्र विशाल कदम वारंवार स्वप्नात येऊ लागल्याने मानसिक तणावातून त्याने स्वतः क्राईम ब्रँच पोलिसांसमोर जाऊन हत्येची कबुली दिली.
Ans: विष्णुनगर पोलिसांनी मुख्य आरोपी प्रभू करकडे आणि मृतदेह लपवण्यास मदत करणारे घरमालक संदीप म्हात्रे या दोघांना अटक केली आहे.