सौजन्य फोटो - सोशल मिडीया,AI Gemini
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील ‘ओबेरॉय कन्स्ट्रक्शन’चे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची या प्रकरणात मोठी फसवणूक झाली आहे. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सुमारे ५० कोटी रुपयांची बिले प्रलंबित होती. ही थकीत बिले सहज मंजूर करून देण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाशी (CMO) आपले जवळचे संबंध असल्याचे आरोपी आसिफ पठाण याने भासवले. स्वतः मुख्यमंत्र्यांचा OSD असल्याची बतावणी करून त्याने कंत्राटदाराचा विश्वास संपादन केला.
प्रलंबित बिलांची मंजुरी मिळवण्यासाठी कमिशन द्यावे लागेल, असे सांगत आरोपीने टप्प्याटप्प्याने कंत्राटदाराकडून ३.२५ कोटी रुपये उकळले. यातील १.२५ कोटी रुपयांचा हप्ता स्वीकारण्यासाठी १० सप्टेंबर रोजी कंत्राटदाराला मुंबईत बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपीने स्वतःच्या साथीदारामार्फत ही रक्कम स्वीकारली होती.
३ कोटी २५ लाख रुपये दिल्यानंतरही काम मार्गी न लागल्याने आणि आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केल्याने कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांना तीव्र संशय आला. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी थेट मुंबईतील मंत्रालयात जाऊन संबंधित OSD आणि अधिकाऱ्याबाबत खातरजमा केली. त्यावेळी आसिफ पठाण नावाचा कोणताही अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात किंवा मंत्रालयात कार्यरत नसल्याचे उघड झाले. आपली कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ओबेरॉय यांनी तात्काळ मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
कंत्राटदाराच्या तक्रारीवरून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आसिफ इस्माईल पठाण याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या महाठगबाजीत आणखी कोणा बड्या अधिकाऱ्याचा किंवा साथीदाराचा सहभाग आहे का? आरोपीने उकळलेली कोट्यवधींची रक्कम कुठे लपवून ठेवली आहे? तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यासाठी पोलीस कसून तपास करत आहेत. आरोपीने अशाच प्रकारे आणखी किती कंत्राटदारांना जाळ्यात ओढले आहे, याचाही शोध मरीन ड्राईव्ह पोलीस घेत आहेत.
Ans: ही घटना मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अकोल्यातील ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची ३ कोटी २५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
Ans: आरोपी आसिफ पठाण याने स्वतःला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून, PWD कडील ५० कोटींची थकीत बिले मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केली.
Ans: याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील आसिफ इस्माईल पठाण (वय ४०) याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.






