सौजन्य फोटो - नवराष्ट्र टीम
स्मशानभूमीत मद्यपान, शिवीगाळ करून धिंगाणा
वाई शहरातील मंदिरांच्या परिसरामागे मद्यपान करून दारूच्या बाटल्या फोडणे, पसरणी घाटातील कट्ट्यांवर बसून मद्यपान करणे आणि त्याच ठिकाणी कचरा टाकणे, तसेच कृष्णा नदीच्या तीरावरील घाट आणि स्मशानभूमी परिसरात मद्यपान करून शिवीगाळ व गोंधळ घालण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे नागरिक आणि भाविकांमध्ये नाराजी होती. या प्रकारांना आळा घालण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे आणि वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली १ सप्टेंबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात आली.
चार पथके एकाच वेळी मैदानात
वाई पोलीस ठाण्याची चार विशेष पथके एकाच वेळी कारवाईसाठी रवाना करण्यात आली. गणपती घाट, पसरणी घाट, परखंदी रोड, विविध स्मशानभूमी परिसर तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी तपासणी सुरू केली. आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापे टाकले. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून नागरिकांना त्रास देणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
सहा गुन्हे दाखल
या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ८५(१) आणि ७५(क) अन्वये एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा रजिस्टर क्रमांक २५६, २५७, २५९, २६०, २६१ आणि २६२/२०२६ यांचा त्यात समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि होमगार्डच्या पथकाने ही कारवाई केली.






