
चंद्रपुरात बनावट गुणपत्रिका, डिग्रीचे रॅकेट उद्ध्वस्त; एक जण अटकेत पण सूत्रधारच फरार
चंद्रपूर : राज्यात एकीकडे प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटीचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे चंद्रपुरात बोगस गुणपत्रिकेची घटना समोर आली आहे. विविध विद्यापीठांच्या बनावट गुणपत्रिका आणि पदवी रॅकेटचा चंद्रपुरात पर्दाफाश करण्यात आला असून, एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. या बोगस गुणपत्रिका प्रकरणातील मुख्य सूत्रधार फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र देण्याबाबत पैशांची मागणी केल्याचा आरोप एका रिक्षाचालकाने केला होता. त्यानंतर, हे प्रकरण चांगलेच गाजले. त्यावर, विद्यापीठाने माहितीही दिली. आता, पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्राला हादरविणाऱ्या एका मार्कशीट आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी वैभव सोनूले नामक एका आरोपीस अटक करण्यात आली असून, रॅकेटचा मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे. मुख्य सूत्रधार मूळ चंद्रपूरचा असून, सध्या राज्याच्या विविध भागात वास्तव्याला असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपीकडून २ आलिशान वाहने जप्त केली आहेत. आरोपींनी लाभार्थीकडून प्रत्येक गुणपत्रिका आणि पदवीसाठी ५ ते १० लाख रुपये घेतले जात होते, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून आरोपींची एकूण मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती लक्षात घेता अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता असल्याचे दुर्गापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक संतोष शेवगावकर यांनी म्हटले.
पुणे विद्यापीठातही समोर आला प्रकार
देशात सध्या NEET परीक्षा पेपरफुटीवरून संतापाची लाट पसरलेली असतानाच महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला हादरा देणारी आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी देण्याचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला असून, एका रिक्षाचालकाला दीड लाख रुपयांत ‘बी.कॉम’चे बनावट प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहे.
राज्यातील परीक्षा अन् पदव्या संशयाच्या भोवऱ्यात
राज्यात आधीच MHT-CET आणि MPSC परीक्षांच्या पेपरफुटीवरून वाद सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी नुकताच MPSC च्या ड्रग्स इन्स्पेक्टर परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता थेट नामांकित पुणे विद्यापीठातूनच बोगस पदवी प्रमाणपत्र वितरीत केले जात असल्याचा प्रकार समोर आल्याने विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.