
रावण दहनात बंटीला संपवण्याचा कट, पोलिस बंदोबस्तामुळे प्लॅन बदलला; तपासातून धक्कादायक माहिती समोर
बंटी आणि पवन यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. या संघर्षात बंटी आपल्यावर वरचढ ठरत असल्याचा राग पवनच्या मनात होता. रामलीला मैदानावरील रावण दहनाच्या कार्यक्रमात बंटी सक्रिय असतो, हे माहीत असल्याने पवनने तेथेच हल्ला करण्याची योजना आखली होती. दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे प्रमुख पाहुणे म्हणून येणार असल्याने रामलीला मैदान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त होता. दांडिया कार्यक्रमात जाऊन परिसराची पाहणी केल्यानंतर पवनने तेथील हत्येचा बेत रद्द केला. मात्र, बंटीविषयीचा राग कायम राहिला आणि पुढे एन-७ परिसरात त्याची हत्या झाली.
हत्येनंतर मोकळ्या मैदानात कट्टा फेकला, मग पोलिस ठाणे गाठले
बंटीची हत्या केल्यानंतर पवन थेट पोलीस ठाण्यात गेला नाही. तो एन-८ मधील शासकीय रुग्णालयाच्या गल्लीकडे गेला. औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेसमोरील मोकळ्या मैदानाजवळून जाताना त्याने चालत्या वाहनातून गावठी कट्टा आणि नऊ काडतुसे फेकली. कट्टा रस्त्यालगतच्या गवतात पडल्याने तो सहज नजरेस आला नाही. त्यानंतर पवन सिडको पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झाला.
चौकशीतून शस्त्राचा ठावठिकाणा
अटकेनंतर चौकशीदरम्यान पवनने शस्त्र फेकलेल्या ठिकाणाची माहिती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक अनिल नाणेकर आणि हवालदार मंगेश पवार यांच्या पथकाने परिसराची पाहणी करून गावठी कट्टा हस्तगत केला. तपास अधिकारी योगेश गायकवाड यांनी शस्त्र जप्त केल्याची माहिती दिली. पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी आरोपीला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे सांगितले.
हे सुद्धा वाचा : अमरावतीत खळबळ! पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
लॉकअपमध्येही वर्चस्वाचीच भाषा
बंटी प्रत्येक कामात अडथळा आणत होता. त्याला स्वतःलाच मोठा भाई समजायचा; आपणही कमी नाही, हे दाखवायचे होते, अशा आशयाची बडबड पवन लॉकअपमध्ये करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, बंटी दीक्षित यांच्यावर शुक्रवारी दुपारी सेंट्रल नाका स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
Ans: पवन पराशरने रामलीला मैदानावरील रावण दहनाच्या कार्यक्रमात बंटीची हत्या करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्याने दांडिया कार्यक्रमात जाऊन रेकीही केली; मात्र कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे त्याने हा बेत बदलला.
Ans: बंटीची हत्या केल्यानंतर पवनने एन-८ परिसरात औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेसमोरील मोकळ्या मैदानाजवळ गावठी कट्टा आणि नऊ काडतुसे फेकून दिली. चौकशीदरम्यान त्याने माहिती दिल्यानंतर पोलिसांनी शस्त्र जप्त केले.
Ans: बंटी दीक्षितच्या हत्या प्रकरणातील आरोपी पवन पराशरला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात पोलीस हत्येचा कट, वापरलेले शस्त्र आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास करणार आहेत.