कारवाईची भीती दाखवून 2.25 कोटी उकळल्याचा आरोप; जयपूरच्या दोन ED अधिकाऱ्यांवर गुन्हा
या प्रकरणी जयपूर येथील ED चे दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता अशी या दोन ईडीच्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. गोरेगाव येथील बांगूर नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
‘गोठवलेले अधिकार तातडीने पूर्ववत करा’; नगराध्यक्ष दिलीप बगाडे आक्रमक
मुंबईतील ‘विंट्री टेक’ कंपनीचे मालक अमूल्य वस्सा यांनी 20 जुलै रोजी जयपूर ED चे सहाय्यक संचालक मोहित गर्ग आणि अंमलबजावणी अधिकारी देवेंद्र गुप्ता मालाड येथील त्यांच्या कार्यालयात गेले होते.पण देवेंद्र गुप्ता आणि मोहित गर्ग यांनी मात्र कोणतेही कायदेशीर कागदपत्र न दाखवता वस्सा यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच त्यांचे कार्यालय सील करण्याची आणि त्यांना अटक करण्याची भीती दाखवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही अधिकाऱ्यांनी सुरुवातीला वस्सा यांच्याकडे आधी 5 कोटींची लाच मागितली होती. तसेच पैसे न दिल्यास कठोर कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप वस्सा यांनी केला. 00. अखेर 2.25 कोटी रुपयांमध्ये तडजोड झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याच संध्याकाळी वस्सा आणि त्यांचे भागीदार आरोपी अधिकाऱ्यांना मालाडमधील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले. चर्चेनंतर दुसऱ्याच दिवशी वस्सा यांनी 1 कोटी रुपये आरोपींकडे सुपूर्द केल्याचा दावा करण्यात आला आहे.
वस्सा यांनी या संदर्भात काही गंभीर आरोपही केले आहेत. आपण गर्ग आणि गुप्ता यांना पहिला हप्ता मिळाल्यानंतर आरोपींनी ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण बंद केल्याचे सांगण्यात आले. पण आपण प्रकरण बंद केल्याची कागदपत्रे मागितली असता फाईलची सत्यता केवळ दिल्लीतच तपासता येईल, असे सांगण्यात आले. 25 जुलै रोजी वस्सा यांच्या दोन सहकाऱ्यांनी दिल्लीतील एका मॉलमध्ये आरोपी अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेथे आरोपींनी प्रकरण मिटवल्याचे कथित बनावट दस्तऐवज दाखवले आणि त्यानंतर उर्वरित 1.25 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
2.25 कोटी रुपये मिळाल्यानंतरही आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच राहिल्याचा आरोप आहे. ‘वरिष्ठ अधिकारी नाराज आहेत आणि त्यांना आणखी पैसे द्यावे लागतील’, असे सांगून अतिरिक्त रक्कम तसेच दरमहा नियमित हप्त्याची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या सततच्या मागणीमुळे संशय आल्याने वस्सा यांनी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली. तसेच ओळखीच्या सूत्रांकडून चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत मोहित गर्ग आणि देवेंद्र गुप्ता हे दोघेही ED चे अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी FIR दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा आणि ED च्या अधिकारांचा गैरवापर करून कट रचला, व्यावसायिकाला धमकावले आणि 2.25 कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडून सुरू असून, आरोपांची सत्यता आणि कथित आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.






