अपर जिल्हाधिकाऱ्याने 15 हजारांची मागितली लाच; अकोल्यात ACB कडून गुन्हा दाखल
अकोला : स्टोन क्रशर सुरू ठेवण्यासाठी अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी १५ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावरूनच येथील अपर जिल्हाधिकाऱ्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने तक्रार केली होती.
अपर जिल्हाधिकाऱ्यासारख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली. प्रमोद गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या अपर जिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. अकोला जिल्हा खाण व क्रशर उद्योजक संघाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात सामूहिकपणे तक्रार दिली होती. यावेळी पुरावा म्हणून अधिकाऱ्यांच्या संभाषणाची क्लिप पोलिसांना दिली होती. तक्रारीनुसार, संघाचे कार्याध्यक्ष विवेक बिजवे यांचे क्रशर पाँईंट आहे. त्यांना अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी फोन केला.
‘तुमच्याकडून १५ हजार आणि संघटनेतील अन्य प्रत्येक सदस्याकडून प्रति महिना पैसे द्या. पैसे न दिल्यास खाण व क्रशरच्या ठिकाणाची पाहणी करून तुमचे कामकाज बेकायदेशीर असल्याचे दाखवून ते बंद करेल’, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर काही वेळाने त्यांच्या शासकीय निवास्थानी जाऊन १५ हजार रुपये दिले. त्यांनी पुन्हा अन्य सदस्यांकडून १५ हजार रुपये गोळा करून द्यावे; अन्यथा कारवाई करु, अशी धमकी दिल्याचे बिजवे यांचे म्हणणे आहे.
गायकवाड यांनी आरोप फेटाळले
तक्रार दिल्यानंतर ९ दिवसानंतर अपर जिल्हाधिकारी गायकवाड यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, गायकवाड यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप यापूर्वीच फेटाळले असून आरोप, निराधार असल्याचा दावा केला आहे.
दोन हजारांच्या लाचप्रकरणी कर्मचारी अटकेत
राज्यासह देशभरात कर्मचारी, अधिकारी यांनी लाच घेतल्याचे अनेक प्रकरण उघडकीस आले आहेत. लाच घेण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जोरदार कारवाई केली जात आहे. अशातच आता तक्रार अर्जाची चौकशी करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या शिरुर तालुक्यातील कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे.






